अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी नरेश गडेकर यांची निवड

रत्नागिरी:- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी नरेश गडेकर यांची निवड झाली. मुंबई येथे झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. ही निवड 15 दिवसांसाठी असून 15 दिवसात नव्याने बैठक बोलवून नव्याने अध्यक्ष निवड प्रक्रिया घेण्यात येणार आहे. 

दिनांक 18 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची विशेष सभा गुरूवार दिनांक 18 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, माटुंगा, मुंबई येथे संपन्न झाली. सभेस एकूण 39 नियामक मंडळ सदस्य उपस्थित होते. नाट्यपरिषदेच्या घटनेप्रमाणे नियामक मंडळाची विशेष सभा घेण्याबाबत प्रमुख कार्यवाह यांना दिनांक 13 जानेवारी 2021 रोजी ते 33 सदस्यांनी अर्ज केला होता. घटनेप्रमाणे 30 दिवसांच्या आत सदरील सभा घेणे हे बंधनकारक होते, यासाठी सात दिवसांची पूर्वसूचना देणेही बंधनकारक होते. परंतु नाट्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाहांनी सदरील सभा आयोजित केली नाही, त्यामुळे नियामक मंडळाच्या 36 सदस्यांनी दिनांक 9 फेब्रुवारी 2021 रोजी सदरील विषयासाठी सभा आयोजित करण्यासाठी नाट्य परिषद मध्यवर्ती कार्यालयात व सर्व नियामक मंडळ सदस्यांना पत्रव्यवहार व ईमेलद्वारे सुचित केले. 

यासभेसाठी संबंधित पदाधिकाऱ्यांनी कोणतेही सहकार्य केले नाही, उलट मा.सिटी सिविल कोर्ट मध्ये ही सभा होऊ नये यासाठी नियामक मंडळाच्या ६४ सदस्यांच्या विरोधात अर्ज दाखल केला, सदरील अर्ज न्यायालयाने फेटाळला. दिनांक 18 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 2 वाजता उपाध्यक्ष ( उपक्रम ) श्री. नरेश गडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली. सदर सभेस एकूण 39 नियामक मंडळ सदस्य उपस्थित होते.
 

सहकार्यवाह सतीश लोटके यांनी उपस्थित सदस्यांचे स्वागत केले. या सभेस सहकार्यवाह सुनील ढगे, संदीप जंगम, गिरीश महाजन, दीपक रेगे, आनंद खरबस, भाऊसाहेब भोईर, विजय चौघुले, सविता मालपेकर, सुशांत शेलार, विजय गोखले, सुनील महाजन, योगेश सोमण, विणा लोकूर, सुरेश धोत्रे, मुकुंद पटवर्धन, दिलीप कोरके, दिपा क्षिरसागर, चंद्रशेखर पाटील, ऊज्वल देशमुख, प्रमोद भुसारी, समीर इंदुलकर व इतर सदस्य उपस्थित होते. सभेत प्रसाद कांबळी हे त्यांच्या अध्यक्षपदाचे बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. 37 सदस्यांनी ठराव संमत केला तर दोन सदस्य तटस्थ होते. अध्यक्षपद रिक्त झाल्याने सभेत याबाबत सविस्तर चर्चा झाली, सभेने पुढील सभा होईपर्यंत नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी श्री . नरेश गडेकर यांची निवड बहुमताने केली. ३९ सदस्यांपैकी ३८ सदस्यांनी गडेकर यांच्या बाजूने मतदान केले . पुढील सभा येत्या १५ दिवसात आयोजित करण्यात येईल. त्यात ५९ सदस्यांमधून अध्यक्षपदाची निवड केली जाईल. सदरील सर्व प्रक्रिया घटनेप्रमाणे पार पडली आहे. नाट्य परिषदेचे कार्य जोमाने सुरु करण्याचा निर्धार सदस्यांनी व्यक्त केला.