गणपतीपुळे किनाऱ्यावर शिल्पातून मतदान जागृती

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा उपक्रम

गणपतीपुळे:- देवरूख येथे संगमेश्वर तालुक्यात नव्याने जिल्हा परिषद शाळेत नियुक्त झालेल्या सुमारे २०० प्राथमिक शिक्षकांचे प्रशिक्षण झाले. हे प्रशिक्षणानंतर दोन मित्र गणपतीपुळे येथे फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांनी २० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यावर मतदान करा, असे वाळूशिल्प काढून जागृती केली.

देवरूख येथील प्रशिक्षणामधून बाहेर पडलेल्या शिक्षकामध्ये राहुल इंगळे व देवीदास जंगमे हे दोघे मित्र रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे दर्शनासाठी गेले. दर्शनानंतर ते गणपतीपुळे किनाऱ्यावर फिरत होते. हे दोघेही बुलढाणा व नांदेड येथील आहेत. त्यावेळी त्यांनी किनाऱ्यावर लहान मुले आणि अनेकजण वाळूत काही चित्रे काढत होते. त्यावरूच त्यांनीही काहीतरी काढूया असे ठरवले.

20 नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानाबाबत जागरुकता आणणारा संदेश देण्यासाठी त्याचे शिल्प काढण्याचे ठरवले. चला मतदान करूया असे शिल्प त्यांनी वाळूत रेखाटले. निवडणूक आयोगाचे बोट, हाताचे शिल्प, त्याखाली चला मतदान करूया असे काढण्याचे ठरवून त्यांनी दुपारी एक वाजता शिल्प काढण्यास सुरुवात करून सुमारे तीन तासांनी हे शिल्प तयार झाले. इथे समुद्रकिनारी आलेल्या पर्यटकांनीही याचे कौतुक केले.

सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी भरती प्रक्रिया सुरू

रत्नागिरी:- रत्नागिरीत होणाऱ्या सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी ५०० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याची जाहिरात एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. विविध अभियांत्रिकी पदांसाठी ही निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. मंत्री उदय सामंत यांनी या कंपनीचे रत्नागिरीत भूमीपूजन केले होते.

रत्नागिरी येथे होत असलेल्या आशियातील पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्प साठी 500 जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याविषयीची जाहिरात वृत्तपत्रातील कंपनीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या प्रकल्पांतर्गत दीड हजार तरुणांना परदेशात प्रशिक्षणासाठी देखील पाठवण्यात येणार आहे. सेमिकंडक्टरमध्ये तैवान, चीन आणि हाँगकाँग यांची मक्तेदारी आहे. या सर्वांचा लिडर म्हणून तैवानकडे पाहिले जाते. इथून पुढे मेड इन इंडिया म्हणून या प्रकल्पातील उत्पादन नावारुपाला येतील.

कारवांचीवाडी येथे दुचाकी घसरुन पती-पत्नी जखमी

रत्नागिरी:- नजीकच्या आदर्श वसाहत- कारवांचीवाडी येथे दुचाकी स्पीडब्रेकरवरुन घसरुन झालेल्या अपघातात पती-पत्नी जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. दोन्ही जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अमोल अनंत विश्वासराव (३८) व आदिती अमोल विश्वासराव (३५) अशी जखमींची नावे आहेत.

अमोल विश्वासराव हे १६ नोव्हेंबर रोजी पत्नीसह दुचाकीवरुन जात होते. कारवांचीवाडी येथून जात असताना सकाळी ११.३० च्या सुमारास स्पीडब्रेकरवरुन अमोल यांच्या ताब्यातील दुचाकी घसरुन अपघात झाला. यावेळी दोन्ही जखमींना तातडीने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

‘उत्पादन शुल्क’कडून १ कोटी ३० लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यात आचारसंहिता काळात अवैध मद्याविरुध्द कारवाईचा बडगा

रत्नागिरी:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्याविरुध्द एकूण १३१ गुन्हे नोंद केले असून ११० आरोपीत अटक केली आहे. हातभट्टीची गावठी दारु ३३४९ लिटर, देशी मद्य ६६.४२ बल्क लिटर, विदेशी मद्य ८२.२६ बल्क लिटर, गोवा राज्यात विक्रीकरिता असलेले विदेशी मद्य ९७९५.९७ बल्क लिटर, रसायन ४१५०५ लिटर तसेच मद्याची अवैधरित्या वाहतूक करणारा आयशर टेम्पो व मारुती स्विफ्ट कार या दोन वाहनांसह एकूण रुपये १ कोटी ३० लाख ८३ हजार ९५ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात दि. १५ ऑक्टोबर रोजी पासून आचारसंहिता लागू झालेली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल घोषित होईपर्यंतच्या कालावधीत अवैध दारुची निर्मिती, वाहतूक तसेच विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून, त्याविरुध्द कठोर कारवाई करण्याकरिता या विभागाकडून ४ पथके नेमण्यात आली आहेत. परराज्यातील/बेकायदेशीर मद्याची अवैध वाहतूक रोखणे, रात्रीची गस्त, संशयित वाहनांची तपासणी तसेच अवैध दारु धंद्याना प्रतिबंध करण्याच्या सूचना सर्व पथकांना देण्यात आल्या आहेत. पथकांकडून अवैध मद्यावर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.
माहे जानेवारी, २०२४ पासून अद्यापपर्यंत महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ मधील कलम ९३ नुसार एकूण २८ प्रकरणात रुपये १६ लाख एवढ्या रक्कमेची चांगल्या वर्तणुकीची बंधपत्रे सतत अवैध दारुधंद्यात गुंतलेल्या आरोपीत इसमांकडून घेण्यात आली आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबई- गोवा, कोल्हापूर-रत्नागिरी, चिपळूण-कराड या महामार्गांवरुन प्रवाशी तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी या विभागाकडून करण्यात येत आहे. तसेच गोवा राज्यातून रेल्वेद्वारे अवैध मद्याची वाहतूक होऊ नये याकरिता कोकण रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून रेल्वे पोलिसांसमवेत अचानकपणे प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्याविरुध्दची कारवाई या पुढेही सुरुच राहील.

जिल्ह्यात कोठेही हातभट्टी दारुची निर्मिती, विक्री, परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक व मद्यसाठा, बनावट माडी विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास या विभागाचा व्हॉट्स अॕप क्रमांक-८४२२००११३३ व टोल फ्री क्रमांक- १८००२३३९९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत आहे. अवैध मद्यासंदर्भात बातमी /खबर देणाऱ्या व्यक्तिचे नाव या विभागाकडून गुप्त ठेवण्यात येईल.

चिंचघर-प्रभुवाडी येथे रोख रकमेसह अडीच लाखांची चोरी

खेड:- खेड तालुक्यातील चिंचघर – प्रभुवाडी येथील अनिल जयराम कदम ( वय – ५५ ) यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप अज्ञात चोरटयाने हत्याराने तोडून घरामध्ये प्रवेश करत घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून १ लाख रोख रक्कमेसह १ लाख ५३ हजाराच्या सोन्याच्या दागिन्यांची अशी एकूण २ लाख ५३ हजाराची धाडसी चोरी केली आहे. हि चोरी दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते १४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजताच्या मुदतीत घडली आहे.

या चोरीची फिर्याद अनिल जयराम कदम यांनी येथील पोलीस स्थानकात दिल्यानंतर पोलीसांनी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ , ३३१ (३), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोरीस गेलेल्या रुपये १ लाख रोख रक्कमेसह चोरीस गेलेल्या मुद्देमाल मध्ये सोन्याचा कुड्याचा एक जोड, ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, ५० हजार रुपये किंमतीची दीड तोळ्याची सोन्याची चैन, ८ हजार रुपये किंमतीची एक-एक ग्रॅमची दोन सोन्याची पाने, १० हजार रुपये किंमतीचा सोन्याचा कुड्याचा एक जोड व १५ हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी असा एकूण रोख रक्कम व सोन्याचे दागिने मिळून २ लाख ५३ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला . अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.

‘वंचित’च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला

नरवण येथे दुचाकीवरुन आलेल्या तीघांनी केले धारधार शस्त्राने वार

गुहागर:- वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ आण्णा जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञातांनी अण्णा जाधव यांच्यावर सपासप वार केले. संबंधित घटना ही एका हॉटेलमध्ये घडली. आरोपी आले तेव्हा अण्णा जाधव हे हॉटेलमध्ये जेवण करत होते. पण आरोपींनी त्याची पर्वा न करता अण्णा जाधव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अण्णा जाधव हे जखमी झाले आहेत. या हल्ल्यातून अण्णा जाधव हे बचावले आहेत. पण त्यांना हाताला गंभीर इजा झाली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती आहे. तिथे त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.

संबंधित घटना ही रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील नरवण फाटा येथील एका हॉटेलमध्ये घडली. अण्णा जाधव हे या हॉटेलमध्ये जेवण करत होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांनी अण्णा जाधव यांच्यावर सपासप वार केले. हल्लेखोरांनी हॉटेलबाहेर अण्णा जाधव यांच्या उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाची देखील तोडफोड केली. आरोपींनी अण्णा जाधव यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. त्यानंतर ते तिथून पळून गेले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अण्णा जाधव यांच्यावर सध्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संबंधित घटनेतील आरोपींना शोधण्यात आता पोलिसांना यश येतं का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरु आहे. हा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. कारण दोन दिवसांनंतर विधानसभेसाठी मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत गुहागरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला होणं अनपेक्षित आहे. या हल्ल्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? हा हल्ला वैयक्तिक कारणास्ताव किंवा आपापसातील वादातून की राजकीय वैमस्यातून करण्यात आला आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोपींचा शोध लागल्यावरच त्यामागचं कारण उघड होण्याची शक्यता आहे. पण संबंधित घटनेमुळे गुहागरमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

जमीन मोजणी चारपट महागली

नवे नियम त्रासदायक ; तीन हजाराऐवजी १२ हजार भरावे लागणार

रत्नागिरी:- निवडणुकांमुळे शेतमोजणीसह अन्य सरकारी कामांना विलंब होत आहे. त्‍यामुळे शेतकरी त्रस्‍त असून आता नव्या नियमांमुळे नाहक मनस्‍ताप सहन करावा लागत आहे. सध्या मोजणीसाठी पूर्वी तीन हजार रुपये भरावे लागत होते. नव्या नियमानुसार आता साध्या मोजणीसाठी १२ हजार रुपये भरावे लागणार आहे. त्यामुळे जमीन मोजणी आता चारपट महागली आहे.

मोजणीचा ऑनलाइन अर्ज भरताना सरकारने साधी, तातडीची, अतितातडीची मोजणी असे तीन प्रकार नमूद केले आहेत. यात साध्या मोजणीसाठी अर्ज केल्‍यास किती कालावधी लागेल याबाबत अनिश्‍चितता असल्‍याने नाहक अतिरिक्‍त शुल्‍क भरून मोजणी करावी लागत आहे. जमाबंदी आयुक्तांकडून शेतजमीन अथवा जागेच्या मोजणीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरले जात आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सरकारच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून एक संकेतस्थळ उपलब्ध केले आहे.

या ठिकाणी मोजणी अर्ज भरायचा आहे. कामात पारदर्शकता यावी, कामात सुसूत्रता यावी म्‍हणून ऑनलाइन मोजणी प्रक्रिया सोयीची वाटत असली तरी ही योजना शेतकऱ्यांसाठी तापदायक आणि खर्चिक ठरत आहे. ऑनलाइन मोजणी संकेतस्थळाला आता कर्मचारीही कंटाळले आहेत. काहीवेळा संकेतस्थळ बंद असते अथवा संथगतीने सुरू असते. त्‍यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामारे जावे लागते. संकेतस्थळावर मोजणी अर्ज भरतानाची प्रक्रिया क्‍लिष्‍ट आहे. त्‍यामुळे सामान्य नागरिक वा शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात.
अर्ज भरताना सरकारने साधी, तातडीची, अतितातडीची असे तीन प्रकार केल्याने शेतकरी व सामान्य नागरिकांना नाहक जास्तीचे शुल्‍क भरावे लागते. हे शुल्‍क एकरी साधारण १२ हजारांपर्यंत येते. पूर्वी साधी आणि तातडीचे असे दोनच प्रकार होते. जे अर्जदार अतितातडीचे शुल्क भरतात त्यांना लगेचच मोजणी तारीख मिळते; परंतु साधी मोजणीत चार महिन्यांनंतर मोजणीची तारीख मिळत असल्याने असंतोष पसरत आहे.

जिल्ह्यात कॉक्ससाकी विषाणूचा प्रादुर्भाव

आरोग्य विभाग अलर्ट मोडवर; उपचार करून घेण्याचे आवाहन

रत्नागिरी:-  हात, पाय आणि तोंडात कॉक्ससाकी या विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. ज्याला आपण मराठीत हात, पाय आणि तोंडाचा रोग (आजार) म्हणतो. जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन त्वरित उपचार करावा तसेच हा आजार संसर्गजन्य असल्याने अशा प्रकारची लक्षणे दिसल्यास शाळा प्रशासनाने आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

हा विशेषकरून लहान मुलांमध्ये पसरतो आणि हात, पाय आणि तोंडावर परिणाम करतो. त्यामुळे संपूर्ण शरीरावर खडबडीत फोड, पुरळ पसरते. हा आजार सहसा 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना संक्रमित करतो. परंतु काही वेळा मोठी मुले व प्रोढाना देखील याचा त्रास होऊ शकतो. मुलांच्या अंगावर पुरळ उठण्याची समस्या असल्यास पालकांनी तात्काळ शासकीय दवाखान्यात जाउन उपार घ्यावेत असे सांगण्यात आले आहे.

आजाराची लक्षणे:
•कधी कधी ताप,घसा खवखवणे,घशात वेदना होणे. •आजारी वाटणे ,सुस्तपणा जाणवणे.•सामान्यत तोंडाच्या मागील बाजूस जीभ,हिरडय़ा,गालाच्या आतील बाजूस व्रण किवा फोड येणे. •हातापायाची तळवे किंवा कधीकधी नितंबावर पुरळ येणे,खाज येत नाही पण फोड येऊ शकतात. •भूक न लागणे ,मुले वारंवार चिडचिड करतात. क्वचित प्रसंगी हा विषाणू मेंदूला किंवा पाठीच्या कण्याला हानी पोहावू शकतो, परिणामी ताप येतो. •निर्जलीकरण, मेंदूज्वर, इंसेफालायटीस सारखे गंभिर परिणाम होऊ शकतात.

कारणे:
•आजार संसर्गजन्य असल्यामुळे नाक आणि घशातील स्राव, लाळ, फोड द्रव, श्लेष्मा किंवा विष्ठेसह एका व्यक्तीपासून दुस्रया व्यक्तीमध्ये पसरतो.•संक्रमित व्यक्तीशी वैयक्तिक संपर्क येणे. •आजारी व्यक्तीच्या शिंकणे किंवा खोकल्याच्या संपर्कात येणे. •दूषित वस्तूंना स्पर्श करणे,जसे की (खेळणी किंवा दरवाजाचे नॉब), •स्विमिंग पूलसारख्या संक्रमित पाण्याच्या संपर्कात येणे.

प्रतिबंध:
•हात धुणे आणि हॅन्ड सॅनिटायझर वापरा.शारीरिक स्वच्छता पाळा. •दरवाजाचे नॉब्स, खेळणी, टेबल इत्यादीसारख्या सामान्य भागांना निर्जंतुक करा. •कपडे,नॅपकिन्स किंवा टॉवेल स्वच्छ ठेव. •सार्वजनिक ठिकाणी आणि आजारी रुग्णांच्या संपर्कात असताना मास्क घाला.

डॉक्टरांना कधी भेटावे:

  • मूल 1 वर्षापेक्षा लहान असल्यास, •उच्च दर्जाचा ताप,तोंडी औषधांना प्रतिसाद देत नाही. •तोंडी काहीही न स्वीकारणे, निर्जलित दिसणे, लघवीचे प्रमाण कमी झाले आहे.•खूप चिडचिड, किंवा कंटाळवाणा आणि जास्त झोप. •फोड / पुरळ संक्रमित दिसणे पू निचरा होणे.

उपचार:
हात-पाय आणि तोंडाच्या आजारावर कोणताही विशिष्ट उपचार नाही. परंतु लहान मुलांना हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. तसेच आजारी असताना सहन करू शकतील असे मऊ अन्न द्यावे. काही दिवस दूध आणि ओआरएसएल (सफरचंद) द्यावे. ताप आणि वेदना कमी करण्यासाठी औषध वापरण्यास सुरक्षित आहे. डॉक्टरांच्या सल्याने शरीरावरील पुरळ/फोडांवर वापरण्यासाठी अँटी-इच ओव्हर-द-काउंटर क्रीम आणि लोशन वापरु शकतात.

हे करा :
•खेळणी निर्जंतुक करण्यासाठी ब्लीच किंवा सनिटायझर वापरा. •आपले हात स्वच्छ धुवा.(विशेषत डायपर बदलल्यानंतर)•तब्येतीत सुधारणा होत नसल्यास डॉक्टरांशी संपर्क करा.• ताप उतरेपर्यंत संपूर्ण विश्रांती घ्या. •दुषित पृष्ठभाग स्वच्छ करा.
हे करु नका:
•अस्वच्छ हातानी डोळे, नाक, तोंडाला स्पर्श करणे. •द्रव पदार्थ घेणे टाळणे. •डॉक्टरांनी सांगितलेली खबरदारी व औषधे टाळणे. •पिण्याचे कप व खाण्याची भांडी सामायिक करणे. •डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे वापरणे.

विधानसभा मतदानादिवशी मतदारांना सुट्टी

रत्नागिरी:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबतचे शासन परिपत्रक उद्योग ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित केले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी,कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील, असे सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी कळविले आहे.

प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनांमधील कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील.

मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही आणि जर अशा व्यक्तीला अशा दिवसासाठी सामन्यता वेतन मिळणार नाही, या आधारावर कामावर ठेवले असेल, तरीही त्यादिवशी त्याला सुट्टी दिली नसती, तर त्यांनी काढले असते असे वेतन त्याला अशा दिवसासाठी दिले जाईल. जर एखाद्या नियोक्त्यांने उपकलमाच्या तरतुदीचे उल्लघंन केले, तर असा नियोक्ता निवडणूक आयोगाच्या नियमानुसार शिक्षेस पात्र असेल. हे कलम अशा कोणत्याही मतदाराला लागू होणार नाही, ज्यांच्या अनुपस्थितीमुळे तो ज्या रोजगारामध्ये गुंतला आहे, त्या रोजगाराच्या संदर्भात धोका किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी,कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील.

वर नमूद केल्यानुसार मतदारास मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, संबंधित नियोक्त्याविरुध्द नियमानुसार योग्य कारवाई करण्यात येईल. तसेस, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदींच्या मालकांनी, व्यवस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी, असे आवाहनही श्री. आयरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 02352-223209 वर संपर्क साधावा.

विधानसभा मतदानादिवशी मतदारांना सुट्टी

रत्नागिरी:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबतचे शासन परिपत्रक उद्योग ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित केले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी,कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील, असे सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी कळविले आहे.

प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनांमधील कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील.

मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही आणि जर अशा व्यक्तीला अशा दिवसासाठी सामन्यता वेतन मिळणार नाही, या आधारावर कामावर ठेवले असेल, तरीही त्यादिवशी त्याला सुट्टी दिली नसती, तर त्यांनी काढले असते असे वेतन त्याला अशा दिवसासाठी दिले जाईल. जर एखाद्या नियोक्त्यांने उपकलमाच्या तरतुदीचे उल्लघंन केले, तर असा नियोक्ता निवडणूक आयोगाच्या नियमानुसार शिक्षेस पात्र असेल. हे कलम अशा कोणत्याही मतदाराला लागू होणार नाही, ज्यांच्या अनुपस्थितीमुळे तो ज्या रोजगारामध्ये गुंतला आहे, त्या रोजगाराच्या संदर्भात धोका किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी,कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील.

वर नमूद केल्यानुसार मतदारास मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, संबंधित नियोक्त्याविरुध्द नियमानुसार योग्य कारवाई करण्यात येईल. तसेस, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदींच्या मालकांनी, व्यवस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी, असे आवाहनही श्री. आयरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 02352-223209 वर संपर्क साधावा.