जिल्ह्यात 45 उमेदवार रिंगणात; 13 लाख मतदारांच्या हाती भवितव्य

रत्नागिरी:- राज्यात विधानसभेसाठीची निवडणूक बुधवारी होत असून, रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघात 1747 मतदान केंद्रांवर 13 लाख 39 हजार 697 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यातून 45 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यात नवतरुणांसह वृध्द मतदारांची संख्याही मोठी आहे. प्रशासनाने जास्तीत मतदान व्हावे यासाठी अगदी ग्रामीण भागापर्यंत मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघासाठी बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपयर्र्त मतदानाचा हक्क मतदारांना बजावता येणार आहे. जिल्ह्यात 1747 विधानसभा मतदान केंद्र असून यात दापोलीत 392, गुहागर 322, चिपळूण 336, रत्नागिरी 352, राजापूर 345 मतदान केंद्र आहेत. यातील शहरीभागात 184 तर ग्रामीण भागात 1563 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.

दापोलीमध्ये 2 लाख 91 हजार 297 मतदार असून यात 1 लाख 39 हजार 895 पुरुष तर 1 लाख 51 हजार 402 महिला मतदार आहेत. गुहागर विधानसभा मतदार संघात 2 लाख 42 हजार 704 एकूण मतदार असून त्यात 1 लाख 15 हजार 511 पुरुष तर 1 लाख 27 हजार 193 महिला मतदार आहेत. चिपळूण मतदार संघात 1 लाख 34 हजार 883 पुरुष तर 1 लाख 41 हजार 183 महिला असे 2 लाख 76 हजार 66 एकूण मतदार आहेत. रत्नागिरी मतदार संघात 1 लाख 42 हजार 48 पुरुष तर 1 लाख 49 हजार 162 महिला अशा 2 लाख 91 हजार 221 एकुण मतदार आहेत. राजापूर मतदार संघात 2 लाख 38 हजार 409 एकूण मतदार असून यात 1 लाख 13 हजार 839 पुरुष तर 1 लाख 24 हजार 570 महिला मतदार आहेत. तर रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 11 तृतीयपंथी मतदार आहेत.

जिल्ह्यात 24 हजार 589 नवमतदार असून ते प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे नवतरुणांमध्ये बुधवारी होणार्‍या मतदानाबाबत उत्साह दिसत आहे. जिल्ह्यात शंभर वयावरील 394 मतदारांची नोंद प्रशासनाने केली आहे. यातही 110 वर्षापेक्षा अधिक वयाची एक महिला मतदाराची नोंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात 7 हजार 201 दिव्यांग उमेदवारांची नोंद आहे. सर्वाधिक दिव्यांग उमेदवारांची नोंद चिपळूणमध्ये आहे.

जिल्ह्यात 13 लाख 39 हजार 697 एकूण मतदार असून यात पुरुष मतदार 6 लाख 46 हजार 176 आहेत. तर 6 लाख 93 हजार 510 इतक्या महिला मतदार आहेत. पाच विधानसभा मतदार संघात मिळून 47 हजारहून अधिक महिला मतदार आहेत. प्रत्येक मतदार संघात आठ ते अकरा हजार इतक्या महिला अधिक आहेत. त्यामुळे पाचही ठिकाणी महिलाच उमेदवारांचे भविष्य ठरवणार आहेत.

गैरसमज पसरवणाऱ्यांना मैदानात पराभूत करणार: दिनेश सावंत

रत्नागिरी:- रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे उबाठाचे उमेदवार बाळ माने हे मागील १० वर्षापासून मे. मिऱ्या पोर्ट प्रा.लि.च्या माध्यमातून पोर्ट उभारणीसाठी प्रयत्नशील होते. मिऱ्या येथे इंटरनॅशनल पोर्ट, लॉजिस्टीक पार्क झाल्यास त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरणार होते. त्यामुळेच ग्रामस्थांमध्ये गैरसमज पसरवल्याचा आरोप मिऱ्या येथील ग्रामस्थ दिनेश सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.

आम्ही याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करु शकलो असतो, परंतु मिऱ्या ग्रामस्थांमध्ये चुकीची माहिती व गैरसमज पसरवणाऱ्यांना मैदानात घेऊन पराभूत करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

रत्नागिरीत सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सडामिऱ्या सरपंच अर्पिता सावंत, ग्रा.पं.सदस्य शिल्पा पवार, जाकिमिऱ्या सरपंच कीर, निशांत सावंत, भैय्या भाटकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी खंडाळा येथील नंदकुमार बेंद्रे, जयगड येथील शराफत गडबडे, जयगड मच्छीमार सोसायटीचे व्हाईस चेअरमन सलीम मिरकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मिऱ्या येथे एमआयडीसीच्या माध्यमातून लॉजिस्टीक पार्क आणि इंटरनॅशनल पोर्ट उभारणार होते. परंतु ग्रामस्थांच्या मोठ्या प्रमाणात जागा जाणार, देवस्थानच्या जागा जाणार, अशा सांगून ग्रामस्थांमध्ये गैरसमज पसरवल्याचा आरोप माजी सरपंच दिनेश सावंत यांनी केला. माजी आमदार बाळ माने यांच्या जाकीमिऱ्या येथील निवासस्थान असलेल्या कमलाश्रमच्या नावाने मिऱ्या पोर्ट प्रा. लि. नावाने कंपनी रजिस्टर्ड करण्यात आली आहे. यासाठी काही एकर जागा मेरीटाईम बोर्डकडून लीजवर घेण्यात आली होती. त्याचे पैसेही भरण्यात येत होते. २०१७ मधील लीजचे पैसे भरले गेले नव्हते. ते. २९ ऑक्टोबरला जमा करण्यात आले. आम्ही याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करु शकलो असतो, परंतु मिऱ्या ग्रामस्थांमध्ये चुकीची माहिती व गैरसमज पसरवणाऱ्यांना मैदानात घेऊन पराभूत करणार असल्याचे दिनेश सावंत यांनी सांगितले. सावंत यांच्याप्रमाणेच वाटद जि.प. गटातील काही ट्रक मालकही उपस्थित होते.

जिल्ह्यात 3 डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी:- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 19 नोव्हेंबर रोजी 00.01 वाजल्यापासून ते दि. 03 डिसेंबर 2024 रोजी 24 वा. पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवशी यांनी दिला आहे.

जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. 66 चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात. अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. तसेच दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजीपासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.

खालील कृत्य करण्यास मनाई करण्यात येत आहे.
शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे. अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे. सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितिनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे.पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.

अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम,, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत. प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणलाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.

मालाची विक्री केल्यानंतर पैशाची विचारणा केल्याने डोक्यात फोडली बियरची बाटली

रत्नागिरी:- बेकरी मालाची विक्री केल्यानंतर पैशाची विचारणा केली. या रागातून बिअरची बाटली डोक्यात मारुन दुखापत करणाऱ्या संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद बोरकर असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १७) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास एमआयडीसी मिरजोळे येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी राकेश सुरेश शिंदे (वय ३७) हे रत्नागिरी बेकरीमध्ये कामाला आहेत. तर संशयित हा गेले दोन महिने राकेश शिंदे यांच्याबरोबर चालक म्हणून आहे. गुरुवारी (ता. १४) ला संशयिताने बेकरीच्या मालाची विक्री करुन हिशोब न देता निघून गेला. रविवारी दीडच्या सुमारास बेकरी मालकीन हीने संशयिताला बेकरीच्या मालाचे पैशाबाबत विचारणा केली असता तो त्यांच्याकडे वादविवाद करत होता. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला समजावले, त्याचा राग मनात धरुन संशयिताने फिर्यादी यांच्या डोक्यात बिअरची काचेची बाटली मारुन दुखापत केली. या प्रकरणी राकेश शिंदे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.

रत्नागिरी नजीक रेल्वे पुलावर तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- शहरानजिकच्या आरटीओ कार्यालया जवळील रेल्वे पुलावर तरुणाने फास्ट रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 3.45 ते 4 वा. कालावधीत घडली आहे.

वासू दौलत कडकपट्टी (22,रा. कुवारबाव, रत्नागिरी ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना त्या ठिकाणी तरुणाचे शीर धडावेगळे झालेले दिसून आले.मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची कार्यवाही सुरु होती.

आंबा बागायतदारांचा महाविकास आघाडीला पाठींबा

रत्नागिरी:- हवामानातील बदल आणि अवकाळी पाऊस यामुळे सतत नुकसानीला सामोरे जाणाऱ्या आंबा बागायतदारांसाठी राज्य सरकारने कोणतीही ठोस मदत न केल्यामुळे आंबा बागायतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांना सोमवारी जाहीर पाठींबा दिला. पावस परिसर हापूस आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

पावस परिसर हापूस आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष आणि कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश साळवी यावेळी म्हणाले की, गेले काही वर्ष आंबा बागायतदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. २०१५ पासून थकीत कर्ज असलेल्या आणि नियमित कर्ज असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकूण संख्या १ लाख ०९ हजार ७४७ आहे. थकीत कर्जदारांची संख्या ११ हजार ३२६ असून २२३ कोटी ८६ लाख रुपये कर्ज थकीत आहे. या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी आमची मागणी होती. मात्र या सरकारने आंबा बागायतदारांच्या कर्जमाफीकडे दुर्लक्ष केले. २०२२-२३ या वर्षात आंबा पीक १० ते १२ टक्के आले होते. मात्र शासनाकडून आम्हाला कोणतीही मदत मिळाली नसल्याची खंत साळवी यांनी व्यक्त केली. आंबा बागायतदारांना पीक विम्याचेही पैसे मिळाले नाहीत. तसेच माकडांकडून होणाऱ्या त्रासाकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. येथील पालकमंत्री आणि सरकारकडे आम्ही वारंवार मागणी करुनही आंबा बागायतदारांचे प्रश्न सुटले नाहीत. महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्याशी आम्ही चर्चा केल्यानंतर त्यांनी आंबा बागायतदारांचे प्रश्न सभागृहात मांडण्याचे आम्हाला आश्वासन दिले आहे. त्यामुळे आम्ही आंबा बागायतदार संघटनांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांना पाठींबा जाहीर केला आहे असे सांगितले. आंबा बागायतदार सुदर्शन तोडणकर यांनीही आपली स्पष्ट भूमिका मांडली. सध्याच्या सरकारने बागायतदारांकडे दुर्लक्ष केले आहे. आंबा बागायतदारांचे प्रश्न महाविकास आघाडीच सोडवू शकते. असा आम्हाला विश्वास आहे. म्हणूनच आम्ही महाविकास आघाडीला पाठींबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संतोष पोकडे, दीपक राऊत, रवींद्र मांडवकर, अमृत पोकडे, अविनाश गुरव, सचिन भातडे, प्रमोद तिवरेकर, भास्कर मुकादम, शोएब काजी आणि इतर बागायतदार उपस्थित होते.

डंपर-दुचाकी अपघात प्रकरणी स्वाराविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- स्वतःच्या किरकोळ तर पत्नीच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल अनंत विश्वासराव ३८, असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १६) आदर्शवसाहत- कारवांचीवाडी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डंपर चालक बुद्धू राजू चव्हाण हे डंपर (क्र. एमएच-०८ एच २२०४) घेऊन कारवांचीवाडी पाण्याची टाकी ते आकाशवाणी केंद्र खेडशी असे जात होते. आदर्श वसाहत येथे स्पिड ब्रेकर वरुन पुढे जात असताना मागून येणाऱ्या दुचाकी (क्र. एमएच-०८ एच २०७०) वरील स्वार संशयित अमोल याने दुचाकी निष्काळजी पणे चालवून डंपरला बाजू देताना अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरिल संशयिताची पत्नी डंपरच्या चाकाखाली येऊन तिला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी पोलिस हवालदार विनोद भितळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सार्वजनिक रस्त्यावर मद्य प्राशन; प्रौढाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- सार्वजनिक रस्त्यावर मद्य प्राशन करणाऱ्या प्रौढाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण गणपत लोंढे (वय ४०) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १७) पावणेसहाच्या सुमारास एमआयडीसी-मिरजोळे येथे निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक रस्त्यावर मद्य प्राशन करत असताना आढळला. या प्रकरणी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल सेजल ठुकरुल यांनी ग्रामीण पोलिस ठाण्या तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अंजनवेल जेटीवर डिझेलची तस्करी करणाऱ्या नऊ जणांना अटक

रत्नागिरी:- गुहागर अंजनवेल जेटी किनारी रविवारी रात्री १ ते ३ वाजण्याच्या दरम्याने अवैधरित्या एका मच्छिमारी बोटीतून डिझेलची तस्करी करत असताना नऊ जणांना गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले. गुहागर अंजनवेल येथे गस्त घालीत असताना गुहागर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करुन दोन कोटी सहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

पोलिसांनी या तस्करीसाठी वापरण्यात आलेले साहित्य मच्छिमारी बोट, बोटीवरील मोटर व पाईप, टँकर (एमएच-४६-बीएम-८४५७), बलेनो कार (एमएच-४६-बीके-२५६८), मच्छिमार बोटीतून २५ हजार लिटर डिझेल, आरोपीच्या ताब्यातील नऊ मोबाईल असा मिळून सुमारे दोन कोटी सहा लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एकूण नऊ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुहागर पोलिसांनी प्रथमच अशी गुहागरमध्ये ही सर्वात मोठी डिझेल तस्करी करणाऱ्या टोळी विरोधात कारवाई केली आहे.

पाटीलवाडी येथे हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी:- शहरानजीकच्या जांभुळ फाटा ते पाटीलवाडी जाणाऱ्या रस्त्यावर कालिकामाता मंदिर येथील पुलाच्या निर्जन ठिकाणी. तसेच खडपेवठार येथील फणसाच्या झाडाखाली व आठवडा बाजार येथे विनापरवाना हातभट्टी दारु विक्री व मद्य सेवन करणाऱ्या तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल सदाशिव जाधव (५०), बिपिन महादेव शेट्ये (४२, विश्वनाथ नथुराम मोरे ३८ अशी संशयितांची नाव आहेत. या घटना रविवारी (ता. १७) सायंकाळी पावणेसहा ते रात्री आठच्या सुमारास निदर्शनास आल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत जांभुळ फाटा येथे विनापरवाना २ हजार २५ रुपयांची दारु जप्त केली. खडपेवठार येथील फणसाच्या झाडाखाली ८२० विदेशी दारु सापडली तर तिसरा संशयित मद्य प्राशन करत असताना निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल कौस्तुभ जाधव, संतीश राजरत्न व पोलिस हेड कॉन्स्टेबल वैभव नार्वेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.