6 व 7 मार्च रोजी कारवाई होणार
रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर नाचणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणार्या साळवी स्टॉप ते टीआरपी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवण्याचा मुहूर्त अखेर प्रशासनाला मिळाला आहे. ६ व ७ मार्च रोजी महामार्गावरील बांधकाम पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
साळवी स्टॉप ते टीआरपी व तेथून थेट कुवारबाव पर्यंत मिऱ्या कोल्हापूर-नागपूर महामार्गावर अतिक्रमण झाले आहे. हे स्टॉलधारकांचे अतिक्रमण आहे. या प्रकरणी अनधिकृत बांधकामाला प्रोहत्सान देणाऱ्या ग्रामपंचायतीची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी जोर धरत होती. हि 15 दिवसात ही बांधकामे हटविण्यात यावी, अशी नोटीस भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने दिली होती. मात्र या नोटीसला केराची टोपली दाखवण्यात आली. याबाबत जोरदार टीका झाल्याने ना.उदय सामंत यांनी त्याची गंभीर दखल घेत अनधिकृत बांधकाम तत्काळ पडण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले होते.
याला काही महिने उलटून गेले तरी येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई होत नव्हती. यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत हा विषय पुन्हा चर्चेला आल्याने ना.सामंत यांनी प्रशासनाची कान उघडणी केली होती. शनिवारी ना. सामंत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा हा विषय चर्चेला आला त्यावेळी ना. सामंत यांनी प्रांताधिकार्यांना त्याबाबतची विचारणी केली असता येथील अनधिकृत बांधकाम ६ व ७ मार्चला पोलीस बंदोबस्तात पाडले जाणार असल्याची माहिती दिली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्याबाबतचे पत्र पोलिसांना दिले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.