रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजिकच्या शिळ येथील सड्यावर लागलेल्या वणव्यात आंबा आणि काजूची शेकडो कलमे जळून खाक झाली. या आगीत बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून येथील बागायतदार पुरते हवालदिल झाले आहेत.
मिरजोळे येथील अनेकांच्या उत्पन्नाचे साधन भातशेती आणि आंबा, काजूच्या झाडापासून येणारे उत्पन्न हेच आहे. मात्र ऐन हंगामात लागलेल्या आगीने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. अचानक लागलेला हा वणवा मिरजोळे येथील सुमारे 25 एकर परिसरात पसरला. या वणव्यात आंबा काजूची झाडे भस्मसात झाली आहेत. हि आग या परिसरातून जाणाऱ्या विद्युत वाहिनीमुळे दोन दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास लागल्याचे बोलले जात आहे. मात्र आगीच्या वणव्यात बागायतदारांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानी तयार केलेल्या आंबा, काजूच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. शासनाने या घटनेकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी बागायतदारांनी केली आहे. मिरजोळे सरपंच संदीप नाचणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली आहे. झालेल्या नुकसानीबाबत तातडीने तहसिलदार प्रशासनस्तरावर पंचनामा करण्याची मागणीही केली.