नाईट कर्फ्यु, लॉकडाऊन टाळण्यासाठी नियमांचे पालन करा: ना. सामंत

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दुसर्‍या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे ‘मी जबाबदार‘ या मोहिमेअंतर्गत सर्वांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचा काटेकोर पालन करावे. तरच आपल्यावर नाईट कर्फ्यू किंवा लॉकडाउनची वेळ येणार नाही, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी केले.  
मंत्री उदय सामंत यांनी झुम अ‍ॅपद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभुमिवर कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन करायचे की नाही, याचा निर्णय 8 दिवसांमध्ये घेतला जाईल, असे स्पष्ट केले. त्या अनुषंगाने आजच जिल्ह्यातील प्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेऊन आढावा घेतला. ते म्हणाले, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क अनिवार्य केले आहे. मास्क न वापरणार्‍यांवर पालिका, ग्रामपंचायत, महसुल विभागाबरोबर पोलिस यंत्रणेलाही अधिकार दिले असून मास्क न वापरणार्‍यांवर 500 रुपये दंडाची कारवाई केली जाईल. जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. मास्क वापरत नसलीत, तर पुन्हा नाकेबंदी किंवा नाईट कर्फ्युबाबत जिल्हाधिकार्‍यांनी निर्णय घ्यावा, असे सूचित केले आहे.

यापुढे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल होणार्‍या कोरोना बाधिताच्या नातेवाइकांची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. जास्तीत जास्त स्वॅब टेस्ट करण्याचा प्रयत्न आहे. खासगी रुग्णालयामध्ये गर्दी, ताप आदीचे रुग्ण उपचार घेऊन घरी जातात यांचीही माहिती घेतली जाणार आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग देखील वाढविले जाणार आहे. एका रुग्णामागे 16 ऐवजी 20 रुग्ण तपासले जाणार आहेत. जिल्ह्यात सध्या 132 अ‍ॅक्टीवर रुग्ण असून 64 रुग्ण हे बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत. मात्र त्यांचा पत्ता रत्नागिरीचा असल्याने त्यांची नावे लागली आहे. विनापरवाना सार्वजनिक कार्यक्रम घेतल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. एकूणच अंदाज घेऊन रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये. तरी रात्रीची संचारबंदी करण्याबाबत चर्चा सुरू आहे. जिल्हाधिकारी यावर निर्णय घेतली. ही वेळ येऊ नये, यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन उदय सामंत यांनी केले. कोकणातील सर्वांत मोठा सण शिमगोत्सव आहे. यावेळी सर्व चाकरमानी कोकणात दाखल होतात. मात्र कोरोनाचे सावट असल्याने तोही साधेपणाने साजरा करावा, असे जनतेला आवाहन करतो. क्रिकेट, कबड्डी, स्नेहसंमेलन हे देखील काही दिवसांसाठी थांबविली पाहिजेच. यातून प्रादुर्भाव वाढू शकतो. सगळ्या यंत्रणेला सहकार्य करावे, असे उदय सामंत म्हणाले.