साळवी स्टॉप येथील वायू प्रदूषण थांबवा अन्यथा रनपवर गुन्हा

रत्नागिरी:- बेफिकीरीबद्दल रत्नागिरी नगर परिषदेला पुन्हा एकदा येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने दणका दिला आहे. अशास्त्रीय पद्धतीने साळवी स्टॉप डंपिंग ग्राउंडमधील कचरा जाळून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. हे प्रदूषण ताबडतोब थांबवा अन्यथा पालिकेवर गुन्हा दाखल करू, असा निर्वाणीचा इशारा देणारे पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज पालिकेला दिले.

वायू प्रदूषण रोखण्यासाठी मंडळ तत्पर असले तरी अजून वायू प्रदुषणाबाबत नमुने घेतलेले नाहीत. पालिकेचे मोठे डंपिंग ग्राउंड साळवी स्टॉप येथे आहे.तेथे शहरातून दिवसाला सुमारे 22 टन कचरा घंटा गाडीद्वारे गोळा केला जातो.त्यामध्ये सुमारे दहा ते बारा टन कचरा ओला असतो. उर्वरित सुका कचरा असतो. कचर्‍यावर प्रक्रिया करणारा घनकचरा प्रकल्प नाही. पालिका गेली कित्येक वर्षे त्यासाठी प्रयत्न करीत आहे. तरी अजून हा प्रश्‍न सुटलेला नाही. त्यामुळे साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राउंडमधील कचरा जाळून पुन्हा त्यावर नवीन कचरा टाकला जातो. जाळलेल्या कचर्‍यामुळे या भागात प्रचंड धूर पसरून प्रदूषण होते. याबाबत अनेक नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केली आहे; मात्र त्याकडे तेवढ्या गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही.नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी कचर्‍यावर प्रक्रिया करणारे छोटे युनिट बसवून कचर्‍यापासून खतनिर्मिती केली; मात्र सर्वच कचर्‍यावर ही प्रक्रिया होत नाही. त्यामुळे कचरा जाळून नष्ट करण्याचा पर्याय वापरला जातो. नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या असून त्यावर मंडळाने पालिकेला इशारा दिला आहे. आता पालिकेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.