आदिती तटकरे; पर्यटनाला चालना देण्यासाठी निर्णय
रत्नागिरी:- कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी लवकरच रत्नागिरी जिल्ह्यातील सहा प्रस्तावना मंजुरी दिली जाईल. त्याचा लाभ पर्यटकांना होणार आहे असे पर्यटन, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्यावर आलेल्या आदिती तटकरे यांनी पर्यटन, क्रीडा विभागाच्या आढावा घेवून अर्थसंकल्पात कोणत्या बाबी मांडता येतील यांची माहिती घेतली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
जिल्ह्यात कातळशिल्प, कासव महोत्सवासाठी प्रथमच तरतूद केली आहे. याला प्रतिसाद मिळाला, तर भविष्यात भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल. कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन धोरणाअंतर्गत काही करार केले जात आहेत. त्यात सिंधुदुर्ग मधील ३, रायगड मधील १ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ६ प्रस्ताव आले असून त्यातील त्रुटी दुर करुन त्यांना मान्यता दिली जाईल. या प्रस्तावांना शासनाकडून विविध योजनामध्ये प्राधान्य, आर्थिक सहाय्य दिले जाईल. शासनामार्फत न्याहरी निवास योजनेअंतर्गत व्यावसायिकांनी नोंदणी केल्यास त्यांना विषेश सवलती देण्याचा विचार सुरु आहे.याची नोंदणी पर्यटन विभागामार्फत केली जाणार आहे असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्याला नैसर्गिक संपदा लाभलेली आहे. येथील गड, किल्ल्यांचे संवर्धन करुन पर्यटकांना आवश्यक मुलभूत सोईसुविधांना प्राधान्य देण्यात येणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी सिंधुरत्न योजना जाहिर झाली आहे. त्यामाध्यमातून पुढील पाच वर्षात महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. याच धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यासाठी २५ कोटी रुपयांची ची विषेश तरतूद जिल्हा नियोजनमधून केली आहे.