रत्नागिरी:- यंदा 14 एप्रिल ते 14 मे हा रमजान कालावधी असल्याने देशी बाजारातच नव्हे तर आखाती देशातही हापूसला मोठी मागणी राहील. त्यामुळे दर्जेदार फळ बाजारात पाठवले, तर दरही चांगला मिळेल. यावर्षी आवक कमी असल्यामुळे पेटीला चांगला दर मिळेल असा विश्वास वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा व्यावसायिक संजय पानसरे यांनी रत्नागिरीतील आंबा बागायतदारांना दिला.
आंबा हंगाम सुरु झाल्यामुळे बागायतदारांशी संवाद साधण्यासाठी संचालक तथा व्यावसायिक संजय पानसरे यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्गत दौरा केला. यावेळी रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे पंचक्रोशीत बैठकीचे आयोजन केले होते. यासाठी आंबा बागायतदार राजन कदम यांनी पुढाकार घेतला होता. कोकणातील बहूतांश आंबा विक्रीसाठी वाशी मार्केटला पाठविला जातो. गतवर्षी कोरोनामुळे केलेल्या टाळेबंदीने आंबा व्यावसायाला फटका बसला होता. व्यावसायिकांची घडी विस्कळीत झालेली होती. कोरोनामुळे दरही कमी राहीलेले होते. दलालांकडील आंबा मुंबईमध्ये विक्री करण्यासाठी दरवर्षी अनेक परराज्यातील लोकं उपलब्ध असतात. टाळेबंदीमुळे गतवर्षी ती लोकं आपापल्या गावीच राहीली. परिणामी बाजारात माल विक्रीसाठी यंत्रणाच ठप्प झाली होती. टाळेबंदी आणि कोरोनातून सर्वच सावरत असल्यामुळे यंदा तो प्रश्न निर्माण होणार नाही; मात्र निसर्गातील बदलांमुळे यंदा आवक कमी राहण्याची शक्यता आहे. या संदर्भात श्री. पानसरे यांनी आंबा बागायतदार यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
याप्रसंगी श्री. पानसरे यांनीही बागायतदारांना यंदाचा हंगाम चांगला जाईल अशी ग्वाही दिली आहे. यंदा 14 एप्रिल 14 मे रमजान कालावधी आहे. या काळात हापूसला प्रचंड मागणी असते. त्यामुळे बाजारात दर टिकून राहू शकतो. दर्जेदार फळ आणि आवक यावर दराचे गणित ठरते. यंदा आवक कमी राहील असा अंदाज आहे. त्यामुळे दर चढेच राहतील. सध्या 10 ते 20 टक्केच मोहार आलेला आहे. गतवर्षीप्रमाणे यंदा दरात घसरण होणार नाही असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.