रत्नागिरी:- क्रेडिट कार्डचे व्हेरिफिकेशन करायचे असल्याची बतावणी करत पाली येथील प्रौढाची सुमारे 1 लाख 21 हजार 186 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.याप्रकरणी 8 जणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीची ही घटना 26 जून 2020 ते 4 सप्टेेंबर 2020 या कालावधीत घडली.
साहिल शर्मा,पायल शर्मा,श्रुती,रिध्दी,राकेश शर्मा आणि इतर 4 जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्याविरोधात रमेश नारायण रहाटे (55,रा.पाली,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानुसार,26 जून ते 4 सप्टेंबर 2020 या कालावधीत त्यांना या आठजणांनी वेळोवेळी फोन केले.संशयितांनी रमेश रहाटे यांना आम्ही अॅक्सिस बँकेतून बोलत असून तुमच्या क्रेडिट कार्डचे व्हेरिफिकेशन करायचे असल्याची बतावणी करत रहाटे यांच्या मोबाईलवर आलेला ओटिपी नंबर विचारुन त्यांच्या खात्यातील रोख रक्कम आपल्याकडे ट्रान्सफर करुन घेतली.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रहाटे यांनी सोमवार 1 फेब्रुवारी 2021 रोजी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली.याप्रकरणी अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.