अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला 20 वर्ष सक्तमजुरी

रत्नागिरी:- दोन भावंडांसह छत्रपती शिवाजी स्टेडिअमवर आश्रय घेतलेल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी न्यायालयाने तरूणाला 20 वर्षे सक्तमजुरी व 15 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.ही घटना 16 जून 2019 रोजी रात्री 8.30 वा.सुमारास घडली होती. 

विकास विठ्ठल पवार (वय 35, रा. मेर्वी, मांडवकरवाडी, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी प्रत्यक्षदर्शीने रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली होती. त्यानुसार,16 जून  रोजी तक्रारदार शिवाजी स्टेडियम येथे रात्रीच्या वेळी वॉकिंगसाठी गेले होते.त्यावेळी त्यांना पायर्‍यांवर एक अल्पवयीन मुलगी आपल्या दोन भावंडांसह झोपलेली दिसून आली होती. त्यांच्या बाजुलाच आणखी एक तरुण तिथे उपस्थित होता. तो संशयास्पदरित्या वावरत असल्याने फिर्यादीने आपल्या आणखी एका सहकार्‍यासह त्याच्यावर नजर ठेवली होती. यावेळी तो अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करताना आढळून आला होता. या दोघांना पाहताच त्याने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला दोघांनी रोखून धरत पोलिसांशी संपर्क साधला आणि सारा प्रकार उघडकीस आला होता.

पोलिसांनी विकास पवारला अटक करुन त्याच्याविरोधात बलात्कार प्रकरणी भादंवि कलम 376 प्रमाणे तसेच बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम क्रमांक 4, 5 (एम), 8 प्रमाणे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.दरम्यान त्या लहान मुलांकडे चौकशी करण्यात आली असता त्यांचे वडील सकाळी रिक्षातून त्यांना या ठिकाणी आणून सोडतात व रात्री घेऊन जातात, अशी माहिती त्या लहान मुलांनी पोलिसांना दिली होती.हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाच त्यावर अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने विकास पवारला 20 वर्षे  सक्तमजुुरी, 15 हजार रूपये दंड व दंंड न भरल्यास 1 वर्षे साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे 16 साथीदार तपासण्यात आले. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांनी केला होता तर पीडित मुलीचे जाबजबाब महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी नोंदवले होते. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. मेघना नलावडे यांनी काम पाहिले.