माळनाका येथील त्या मुलीचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त… हे आहे कारण

रत्नागिरी:- माळनाका नजिकच्या तारापार्कच्या टेरेसवर मृतावस्थेत आढळलेल्या ११ वर्षीय बालिकेचा मृत्यू पल्मोनरी एडेमा या फुप्फुसाशी संबंधित आजाराने झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी कनिका सुधीर चुनेकर हिची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

शहरातील माळनाका नजिकच्या तारापार्कच्या टेरेसवर सायंकाळच्या सुमारास कनिका चुनेकर ही ११ वर्षीय बालिका मृतावस्थेत आढळली होती. आई-वडिलांसह शेजाऱ्यांनी तिला जिल्हा रूग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषीत केले होते. परंतु कनिकाचा मृत्यू नेमका कशाने झाला हे बुधवारी रात्री स्पष्ट झाले नव्हते. कनिकाच्या मानेभोवती व्रण असल्याने पोलिसांनी सर्व दिशेने तपास सुरू केला होता.

रात्री उशिरा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर कनिकाचा मृत्यू पल्मोनरी एडेमा या आजाराने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सर्व शंकांना पूर्णविराम मिळाला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.