राजापूर तालुक्यातील धाऊवल्ली – पारवाडी येथील घटना
रत्नागिरी:- शिकारीसाठी गेलेल्या शिकाऱ्याच्या बंदुकीतील गोळी सुटून शिकाऱ्याचाच मृत्यू झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील पारवाडी येथे घडली आहे. सोमवारी दुपारी 12.30 च्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस कारवाई सुरू होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी राजापूर तालुक्यातील नवेदर – भिकारवाडी येथील दोघेजण शिकारीसाठी धाऊलवल्ली पारवाडी येथील जंगलात गेले होते. यावेळी शिकारीसाठी नेलेल्या बंदुकीतून अचानक गोळी सुटून ती अनिल शंकर भालवलकर याच्या पोटाच्या भागाकडे लागली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच नाटे पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनीही भेट देऊन माहिती घेतली. एकास नाटे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती.