जिल्हाधिकारी यांचा ठपका; औषध विभागातील अधिकारी रडारवर
रत्नागिरी:- कोल्हापूरहून केलेल्या औषध खरेदी प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. चौकशी अहवालावर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्हा रुग्णालयाच्या औषध विभागावर ठपका ठेवला असून, आपल्या स्तरावर त्याचा निपटारा करावा, असे पत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांना दिल्याचे समजते. यात औषध विभागाचे काही अधिकारी, कर्मचारी दोषी असून, त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
दोन ते अडीच महिन्यांपूर्वी हे औधष खरेदी प्रकरण उघड झाले. कोल्हापूरहून दोन टेम्पो शहरातील आठवडा बाजारात आले होते. बाजारपेठेत ते फिरताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले; मात्र ते कोणाकडे आणि कशासाठी आले हे सांगता आले नाही. संशय बळावल्यानंतर पोलिसांनी दोन्ही वाहनांची झडती घेतली. तेव्हा त्यामध्ये औषधांचे बॉक्स सापडले. चालकांकडे कोणतीही रिसिट नव्हती किंवा पत्ता नव्हता. तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
घटनास्थळी पोचल्यानंतर त्यांनी वाहनांची चौकशी करून एका टेम्पोमध्ये सर्व बॉक्स भरले. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे चौकशी केली, तर त्या बॉक्समध्ये सर्व सलाईनच्या बाटल्या होत्या. सुमारे ३० हजार रुपये किमतीची ही औषधे होती. चौकशी अधिकारी म्हणून प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी यांची नियुक्ती केली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपला अहवाल दिला.अहवाल पाहिल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या औषध विभागाचा हलगर्जीपणा यामध्ये दिसून येतो.
तुमच्या स्तरावर त्याचा निपटारा करा, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. फुले यांना दिले आहे. यामध्ये औषध विभागाच्या महिला अधिकाऱ्यासह काही कर्मचारी दोषी असल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बोल्डे यांनी मार्चमध्ये या औषधांची ऑर्डर दिली होती; मात्र त्यांची बदली झाल्यानंतर ती मागविण्यात आली. सिव्हिलची ऑर्डर असताना एका महिलेच्या व्यक्तिगत पत्यावर औषधं कशी येतात, असे प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने संबंधितांवर कारवाई होणार आहे.