दोनवेळा चाकू भोसकला, नंतर गळा दाबून मारण्याचा प्रयत्न; पत्नीने दाखवले प्रसंगावधान आणि वाचला जीव

रत्नागिरी:- शहरातील जुना माळ नाका येथील लिमये वाडी अंतर्गत रस्त्यांवर काल रात्री ९ च्या सुमारास घडलेल्या या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली. याबाबत आता पोलीस तपासातून अधिक माहिती पुढे येत आहे. पत्नीला ठार मारण्याचा उद्देशानेच अमोल दाखल झाला होता. सोबत आणलेला चाकू त्याने दोनवेळा पत्नीच्या पोटात भोसकला. पत्नीने प्रसंगावधान दाखवत चाकू पकडला यावेळी अमोलने तिचा गळा दाबत तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. पत्नीने आरडाओरडा केल्याने लोक जमल्याने अमोलने घटनास्थळावरून पळ काढल्याने पत्नीचा जीव वाचला. 

तपासाची चक्र वेगाने फिरवीत पोलिसांनी कालच आरोपी पतीच्या मुसक्या आवळल्या. पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार आरोपी पती अमोल देसाई, समर्थ नगर गोडाऊन, रत्नागिरी याने पैसे देतो असे सांगून पत्नी आसावरी हिला रस्त्यावर बोलावून घेतले होते. रस्त्यावरची माणस जाऊदेत मग पैसे देतो असे सांगताच पती हा पैसे देणार नाही असे समजून आसावरी परत निघाली होती. याच वेळी अमोलने खिशातून चाकू काढला व आसावरी हिला भर रस्त्यात दोनवेळा भोसकले. पुन्हा चाकू मारत असताना असावारीने नेटाने विरोध करीत तो चाकू हाताने धरला. यामुळे तिच्या डाव्या हाताला देखील दुखापत झाली. या झटापटीत आरोपीने असावारीला खाली पाडले व ठार मारण्याच्या उद्देशाने गळा देखील दाबला. परिसरातील नागरिकांनी आरडओरडा केल्यावर आरोपीने तेथून पळ काढला. जखमी आसावारीवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती आता स्थिर आहे .