जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी उमेदवारांची धावाधाव 

रत्नागिरी:- जिल्ह्यातील जब्बो ग्रामपंचायतींची निवडणूक एकाच वेळेत होत आहे. ग्रामपंचायत निवडणूकीला प्रवर्गातून उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती बंधनकारक असल्याने सोमवारी पडताळणीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाली होती. सोमवारपर्यंत १ हजार ३५० उमेदवारांनी पडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहे.

 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मागासवर्गातून उभे राहणाऱ्या उमेदवारांची जात प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची लगबग सुरु झाली आहे.  ग्रामपंचायतीच्या मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या सर्व मागासवर्गीय उमेदवारांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून जात प्रमाणपत्र प्राप्त करावे लागणार आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया ही पूर्णत: ऑनलाईन झाली आहे.

ऑनलाईन प्रक्रियेत अर्जदाराने ऑनलाईन अर्जातील सर्व आवश्यक माहिती भरून तसेच आवश्यक सर्व दस्तावेज स्कॅन करून अपलोड करणे व त्यानंतर ऑनलाईन शुल्क भरून ऑनलाईन भरलेला अर्ज, ऑनलाईन पैसे भरल्याची पावती व सोबत सर्व मूळ दस्तावेज व त्याच्या छायांकित प्रतीसह समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत विहीत मुदतीत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. या ऑनलाईन प्रक्रियेत अर्जदाराने ऑनलाईन अर्जातील सर्व आवश्यक माहिती भरून तसेच आवश्यक सर्व दस्तावेज स्कॅन करून अपलोड करणे व त्यानंतर ऑनलाईन शुल्क भरून ऑनलाईन भरलेला अर्ज, ऑनलाईन पैसे भरल्याची पावती व सोबत सर्व मूळ दस्तावेज व त्याच्या छायांकित प्रतीसह समिती कार्यालयात मुदतीत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.  
   

यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठीचा आपला अर्ज वेबपोर्टलवर परिपूर्ण माहितीसह भरून व आवश्यक सर्व दस्तावेज अपलोड करून ऑनलाईनवर सबमिट करावे व त्यानंतर त्याची प्रिंट घेऊन पूर्वीप्रमाणेच विहित कार्यपद्धतीने जिल्हाधिकारी अथवा निवडणूक अधिकारी यांच्यामार्पत समिती कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावे. जुन्या पद्धतीने हस्तलिखित व ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांसह त्या-त्या राजकीय पक्षांच्या नेतेमंडळी, पुढार्यांचीही चांगलीच दमछाक झाली आहे.
 

गेले तीन दिवसांपासून नाताळ, चौथा शनिवार, रविवार असे सुट्टीचे वार आले होते. तरीही जिल्हा प्रशासनस्तरावर निवडणूकीच्या इच्छुक उमेदवारांच्या कामकाजासाठी संबधित विभाग सुरू ठेवण्यात आले होते. येथील विभागीय जात पडताळणी केंद्र, कुवारबाव येथे तर सोमवारी सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांचे पुढारी, इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती. सुरूवातीला याठिकाणी प्रस्ताव स्विकारण्यासाठी दोन खिडक्या खुल्या करण्यात आलेल्या होत्या. मात्र होणारी गर्दी लक्षात घेत आणखी २ खिडक्या सुरू करण्यात आल्या. त्यामुळे झालेली गर्दी तात्काळ कमी झाली.