रनप सभापती निवडीचा सस्पेन्स कायम

उद्या निवड; नव्याने सेनेत आलेल्या नगरसेवकांना मिळणार संधी

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या विषय समितीच्या निवडणुका उद्या होणार आहेत. त्यामुळे पालिकेतील इच्छुकांनी पसंतीचे सभापतीपद मिळण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. महत्त्वाच्या आरोग्य आणि पाणीपुरवठा समिती सभापती पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे; मात्र त्या बिनविरोध करण्यावर सेनेचा भर आहे. राष्ट्रवादीतून सेनेत आलेल्या नगरसेवकांना देखील सेनेकडून संधी देण्यात येणार आले. 

पालिकेच्या विषय समित्या सदस्य, सभापती आणि स्थायी समिती सदस्यांच्या निवडीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला आहे. पालिकेत शिवसेनेचे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे सर्व सभापतीपदे शिवेसेनेकडेच येणार आहेत. बांधकाम, आरोग्य, पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण, नियोजन या पाच समित्या असून उपनगराध्यक्ष हे शिक्षण समितीचे पदसिद्ध सभापती आहेत. समाजकल्याण सभापतीपद शिवसेनेच्या वैभवी खेडेकर यांच्याकडेच राहणार आहे. आरोग्य आणि पाणीपुरवठा समिती सभापतीपदे ही महत्त्वाची आहेत. त्यामुळे या समित्यांचे सभापतीपद मिळवण्यासाठी शिवसेनेचे इच्छुक नगरसेवक आपल्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. सोमवारी या निवडी होणार असून निवडणुकीसाठी विशेष सभेचे आयोजन केले आहे.

सभापती पदासाठी निमेश नायर, सुहेल साखरकर, फरहा पावसकर यांची नावे आघाडीवर आहेत. 
प्रांताधिकारी या सभेचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहे. दुपारी 2 वा. चित्र स्पष्ट होणार असून या निवडी बिनविरोध होणार आहेत. प्रत्येक समितीत 7 सदस्य असणार असून शिक्षण समितीत मात्र 8 सदस्य असणार आहेत. स्थायी समितीवर 3 सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे दोन आणि भाजपच्या एका सदस्याचा समावेश असणार आहे. सदस्य आणि सभापती पदाची नावे गटनेत्याकडून निश्‍चित करून ती ते पीठासीन अधिकार्‍यांकडे दिली जाणार आहेत.