रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील ओझर येथील माध्यमिक विद्यामंदिरमधील 3 शिक्षकांच्या पगारातून सुमारे 81 हजार रुपयांचा अपहार केल्याची तक्रार शिक्षकांनी राजापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. शाळेतील चार शिक्षकांच्या पगारातून होणारी पतपेढी कपातीची रक्कम पतपेढीच्या खात्यात जमा केली नसल्याचा आरोप या शिक्षकांनी केला आहे.
ओझर माध्यमिक विद्यामंदिरचे सहाय्यक शिक्षक शरद दत्ताराम देसाई यांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. शाळेतील शिक्षकांची वेतनपत्रके पाठविली जातात.पतपेढीने कळविलेल्या रक्कमेनुसार कपात न करता आमच्या पगारातून जादा रक्कम कापून घेतली. जास्तीची रक्कम आमच्या खात्यातच जमा होणे आवश्यक असताना ती इतर खात्यावर जमा केली. मार्च 2019 ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत देसाई यांचे 44 हजार, शिक्षक चंद्रकांत पाटील यांचे 35 हजार तर मुरलीधर खानविलकर व बजरंग सातपुते यांचे प्रत्येकी एक हजार असे सुमारे 81 हजार रूपयांचा अपहार केला. ही कपात आम्हाला कोणतीही कल्पना न देता केल्याचे देसाई यांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे. पतपेढीतील कपातीप्रमाणे विमा पॉलीसीच्या हप्त्यासाठीही आमच्या पगारातून कपात केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र विमा कंपनीला पैसेच भरले जात नसल्याने पॉलिसी बंद पडल्या आहेत. या पत्रकातून दर महिन्याला इनकम टॅक्ससाठी कपात केली जाते. वर्षाच्या अखेरीस टॅक्ससाठी कपात केलेला रक्कमेपेक्षा जादा रक्कम भरावी लागते. मागील 20 महिने हा अपहार सुरू आहे, त्याची चौकशी करा, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.