ग्रामपंचायत निवडणुका; 23 ठिकाणी चाचपणी पूर्ण
रत्नागिरी:- ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यस्तरावरील महाविकास आघाडी पहायला मिळावी यासाठी प्रयत्न सुरु असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी तालुक्यातील कार्यकर्ते प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोचण्यासाठी सरसावले आहेत. 53 पैकी 23 ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचे स्वतंत्र पॅनल उभे करण्याची तयारी पूर्ण झाली असून उर्वरित ठिकाणी चर्चा सुरु आहे. शिवसेनेला पर्याय म्हणून ग्रामीण भागात राष्ट्रवादी आणि भाजप सज्ज झाले आहेत.
शिवसेनेच्या बरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेसने रत्नागिरीत तालुक्यात चांगली भरारी घेतली होती; परंतु नेत्यांनी अदलाबदल केल्यानंतर हा मतदारसंघ भगवेमय झाला. जिल्हा परिषदेपर्यंत सगळीकडेच शिवसेनेचाच बोलबाला आहे. राज्यात महाविकास आघाडी असली तरीही राष्ट्रवादी आपली जुनी ओळख निर्माण करण्यासाठी पावले उचलत आहे. आघाडी करण्यापेक्षा राष्ट्रवादीतील नेत्यांकडून स्वतंत्र लढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. निवडणुक जाहीर झाल्यानंतर विधानसभेसाठी इच्छुक असलेले बशीर मुर्तूझा, माजी तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर, ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली गावनिहाय बैठका सुरु झालेल्या आहेत. राष्ट्रवादीतर्फे कुरधूंडा, सोमेश्वर, डिंगणी, आगरनरळ, गावखडी, नाचणे यासारख्या प्रमुख ग्रामपंचायतींसह 23 ठिकाणी आपली स्वतंत्र पॅनल उभी करण्याची तयारी केली आहे. उमेदवार सज्ज असून महाविकास आघाडीचा निर्णय झालाच नाही, तर राष्ट्रवादी स्वतंत्र ताकद निर्माण करण्यासाठी तयार झाली आहे. रत्नागिरी तालुकाध्यक्षपदाचा तिढा अजुनही सुटलेला नसल्याने राष्ट्रवादीत धुसफुस असली तरीही त्याचा परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत.