ना. आदित्य ठाकरे यांच्या सूचना; रोजगार निर्मितीवर भर
रत्नागिरी:- कोकणात बीच शॅक टुरिजम, टेंट टुरिजम, कॅराव्हॅन टुरिजम यासह कृषी पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात वाव आहे. होम स्टेच्या माध्यमातून येथे लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईपासून गोव्यापर्यंतच्या विविध पर्यटन ठिकाणांच्या विकासाचा आराखडा करुन त्याला चालना देण्यात येईल. दर महिन्याला बैठक घेऊन कोकणाचा पर्यटन विकास व त्या माध्यमातून रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील बैठकीत सांगितले.
कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य यांनी ही बैठक घेतली. यावेळी कोकणातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी बीच शॅक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. कोकणात पंचतारांकीत हॉटेल्स गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे यावेळी आदित्य यांनी सांगितले. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक धनंजय सावळकर, आमदार योगेश कदम, रत्नागिरी व सिंधुदूर्गचे जिल्हाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
याप्रसंगी मंत्री सामंत म्हणाले की, कोकणातील साने गुरुजी यांचे स्मारक, कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे स्मारक आदी कामांना मंजुरी देऊन त्यास गती देण्यात यावी. त्याचबरोबर कोकणासह राज्यातील किल्ल्यांच्या विकासाला चालना देण्यात यावी. दुबईच्या धरतीवर कोकणात ग्लोबल व्हीलेजसारखा पर्यटन उपक्रम राबविता येऊ शकेल.