रत्नागिरी:- कोकणातील ग्रामीण भागात मंगळवारी देवदिवाळीचा सणपरंपरेनुसार व श्रध्देने साजरा झाला. यादिवशी सम्राट बळीराजाचे स्मरण करत घरात विडे भरणे तसेच ग्रामदेवालयातही देवांना रुपे लावून विडे भरण्याचा कार्यकम उत्साहात पार पडला.
दिवाळीच्या (नरक चतुर्दशी) नंतर म्हणजेच सुमारे महिनाभराच्या कालावधीनंतर देवदिवाळी साजरी होते.देवदिवाळीला शेतकऱ्यांची दिवाळी म्हणून ओळखले जाते. यादिवशी ग्रामीण भागात शेतकरी वर्गात घरोघरीया उत्सवाची मोठी लगबग असते. सकाळी लवकर उठूनघरोघरी आंबोळीचे पदार्थ केले जातात. त्यानंतर गोठ्यात दिवा-बत्ती केली जाते. गुरांना ओवाळणी आणि त्यांना आंबोळीही खाऊ घातली जाते. त्यानंतर शेतकरी आपल्या घरांमध्ये देवाच्या नावाने विडे भरण्याचा कार्यकम केलाजातो.
मंगळवारी जिल्ह्यामध्ये काही गावोगावी घरात सामुदायिक तर काही ठिकाणी वैयक्तिक अशा स्वरूपात विडा भरण्याचा कार्यकम साजरा झाला. त्यासाठी ग्रामस्थ एकत्र येऊन हा कार्यकम केला जातो. गादी तयार करूनत्यावर विडे मांडले जातात. विडे भरतेवेळी गाऱ्हाणे व सम्राट बळीराजाचे स्मरण म्हणून ‘इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ अशी आळवणी शेतकरी करतात. त्यानंतर विडे एकमेकांना वाटप केले जाते. घरातील विडे भरल्यानंतर त्यातील एक विडा ग्रामदेवतेच्या नावाने काढण्यात येऊन तो ग्रामदेवळात नेण्याची पथा जपली जात आहे. देवदिवाळीच्या मूर्हूतावर ठिकठिकाणच्या देवस्थानच्या जत्रांनाही प्रारंभ केला जातो.