रत्नागिरी:- गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याची धुप थांबविणे, किनारा अधिक सुरक्षित करण्याबरोबरच येथील सौंदर्यात भर घालण्याच्या हेतूने समुद्रात 200 ते 300 मिटरवर रिब्स बांधण्याची महत्वाकांक्षी योजना मेरिटाईम बोर्डाने हाती घेतले आहे. या बाबत गुरुवारी स्थानिक व्यावसायिकांशी गणपतीपुळे देवस्थान सभागृहात झालेल्या अनौपचारिक चर्चेत माहिती देण्यात आली.
यावेळी मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, समुद्रात दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर रिब्स बांधल्यास पाण्याचा वेग कमी करण्यास मदत मिळेल. समुद्राच्या वेगवान लाटांचा मारा कमी झाल्याने समुद्राची धूप कमी होण्यास मदत होईल. समुद्रात रिब्स उभारण्याच्या कामाबरोबरच स्थानिक व्यावसायिकांना वाळूचे उंच ढिगारे करून उभारून त्यावर दुकान गाळे बांधून देण्याचा विचारही सुरु असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. या योजनेचा एकूण खर्च, कामाचा कालावधी व आराखडा या बाबत सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र या बैठकीत उपस्थितांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते.
गुरुवारी झालेल्या या बैठकीत स्थानिकांकडून समुद्रसपाटीवर बांधलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा प्रश्न आग्रहाने मांडण्यात आला. तसेच प्रस्तावित योजनेत वाळुच्या ढिगाऱ्यांवर योग्य पद्धतीने दुकान गाळे बांधून मिळाल्यास व्यावसायिकांकडून सहकार्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
दहा वर्षापूर्वी गणपतीपुळे किनारी बांधलेल्या धूपप्रतिबंधक बंधाऱयाची दुरवस्था झाल्याचे यावेळी अधिकाऱयांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. गणपतीपुळे समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक बंधारा बांधून त्यावर पायऱ्यांची रचना केल्याने पर्यटकांना तेथे बसून सुर्यादय व सुर्यास्ताचा आनंद लुटता येतो. परंतु मंदिरासमोरील बंधाऱ्याचा भाग ढासळल्याने पर्यटकांना समुद्रावर उतरताना अडथळा निर्माण होतो. या बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. त्यामुळे समुद्रात होणारे रिब्सचे प्रस्तावित काम कोणत्या दर्जाचे होणार या बाबत ग्रामस्थांसमोर प्रश्नचिन्हच आहे.
वरिष्ठांकडून पत्र मिळताच वॉटरस्पोर्टस्ना परवानगी
वरिष्ठ पातळीवरून वॉटरस्पोर्टस् सुरू करण्याबाबत पत्र मिळताच गणपतीपुळेतील बंद असलेले वॉटरस्पोर्ट सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल, असे आश्वासन मेरिटाईम अधिकाऱयांनी स्थानिक वॉटरस्पोर्ट व्यावसायिकांनी दिले. येथील वॉटरस्पोर्टस् पुन्हा सुरू करण्यासंदर्भात व्यावसायिकांनी बैठकीत मुद्दा उपस्थित केला होता.