रत्नागिरी:- अंगणवाड्यातील मुले, गरोदर मातांना पुरवण्यात येणार्या खराब धान्याचे नमुने अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. भारतीय जनता युवो मोर्चाने पर्दाफाश केल्यानंतर सुरवातीला अधिकार्यांची टाळटाळ सुरु होती; मात्र भाजप पदाधिकार्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर महिला व बालविकाससह अन्न, औषध प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोचले. माल स्थलांतरीत करण्याच्या शक्यतेमुळे गोडावूनला टाळे ठोकण्यात आले आहे.
मिरजोळे एमआयडीसीतील गोदामातील खराब धान्याची माहिती मिळाल्यानंतर माजी खासदार निलेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली युवक जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, उपाध्यक्ष नंदू चव्हाण यांनी गोदाम गाठले. गोदामात गव्हाची फुटलेली पोती, गव्हात दगडांसह कचरा पहायला मिळाले. धान्य भरणार्या कामगारांना सुरक्षित साधने नव्हती. गव्हाप्रमाणेच हरभरेही लागलेले, त्यात टोके पडलेले होते, मसुरडाळीचीही तीच अवस्था होती. अधिकार्यांना फोनाफोनी करण्यात आली; मात्र एकही अधिकारी सायंकाळपर्यंत पोचला नाही. ग्रामीण पोलिसांनीही पाहणी केली. रात्री उशिरा अन्न व औषध प्रशासनचे अधिकारी, महिला व बालविकासचे श्री. कातकर घटनास्थळी पोचले. अन्न व औषधमार्फत खराब धान्याचे नमुने घेण्यात आले. दुसर्या गोडावूनमध्ये असलेल्या मीठ, मिरची, मसाला, हळद, तेल याचीही पाहणी करण्याची मागणी पदाधिकार्यांनी केली. ठेकेदार प्रतिनिधीकडून टोलवाटोलवी करण्यात आली. त्यामुळे त्या वस्तूंच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली असून जिल्हाधिकार्यांनी गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी अनिकेत पटवर्धन यांनी केली. महिला व बालविकासचे प्रतिनिधी श्री. कातकर यांनी रात्री गोडावूनला टाळे मारुन त्याच्या चाव्या ताब्यात घेतल्या.
यासंदर्भात श्री. पटवर्धन म्हणाले की, रत्नागिरीतील 2800 अंगणवाडीतील सुमारे आठ हजार मुलांना याचा पुरवठा करावयाचा आहे. एका महिला बचत गटामार्फत हे वाटप होते. तो गट रत्नागिरीत कुठेच कार्यरत नाही. धान्य भरणे, पॅकिंग करणे यासाठी एकही महिला कार्यरत नाही. याचे कनेक्शन मुंबईशी असून बीडच्या एका व्यक्तीकडे रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी आहे. ठेकेदाराला महिन्याला अडीच कोटी तर वर्षभरासाठी अंदाजे 25 कोटी दिले जातात. चिपळूण येथील खडपोलीमधील प्रकार माजी आमदार विनय नातू यांनी बंद पडला होता. तेथील गोडावून सील केले होते. त्यानंतर रत्नागिरीत हे काम सुरू आहे. गोडावूनमध्ये बिहारचे 13 जण कामगार असून तेरा दिवस झाले तरीही त्यांची कोरोना चाचणी केलेली नाही.