जि. प. भवनात एकच चर्चा
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेतून दीड वर्षांपुर्वी गायब झालेला दीड कोटीचा धनादेश अचानक अधिकार्यांच्या कार्यालयाच्या दरवाजाला लावलेला सापडल्यामुळे तर्क-वितर्काना उधाण आले आहे. या विषयावर 10 तारखेला होणार्या सर्वसाधारण सभेत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
तत्कालीन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सरोवर संवर्धनांतर्गत एक कोटी 47 लाख रूपयांचा निधी मंजूर केला होता. त्यात खेड तालुक्यातील सवेणी व घेरापालगड येथील दोन तलावांचे नूतनीकरण व सुशोभिकरण करण्याचे आदेश काढले होते. त्यात सवेणीसाठी 1 कोटी 25 लाख तर घेरापालगडसाठी 12 लाख 82 हजार रूपये मंजूर केले. या कामांचे दोन धनादेश खेड पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे 14 जून 2019 रोजी पाठवण्यात आले होते. याबाबत आमदार योगेश कदम यांच्याकडे गेल्या आठवड्यात हा विषय मांडण्यात आला होता. त्यांनी त्वरित या धनादेशाबाबत जिल्हा परिषदेशी संपर्क साधला. तो धनादेश टपालाने सामान्य प्रशासन विभागाकडे गेला होता. मात्र त्यांच्यापर्यंत तो पोचलेला नव्हता. आमदार कदम यांनी सामान्य प्रशासन विभागातील अधिकार्यांची झाडाझडती घेतली होती. दीड वर्ष हा धनादेश गायबच होता. तो धनादेश मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या दरवाजाच्या बाहेर कडीला प्लास्टीक पिशवीत अडकवलेला सापडला. यावरुन जिल्हा परिषदेत उलट-सुलट चर्चा सुरू आहे.