ठाकरे सरकारला आव्हान देणं हे योगी आदित्यनाथ यांना झेपणारं नाही: खा. विनायक राऊत

रत्नागिरी:- ठाकरे सरकारला आव्हान देणं हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना झेपणारं नाहीय. तसा प्रयत्न त्यांनी करू नये, असं म्हणत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबईतील बाॅलीवूड उत्तर प्रदेशात नेण्यासाठी बाॅलीवूड कलाकारांसोबत ते चर्चा करत आहेत.याबाबत बोलताना खा विनायक राऊत म्हणाले की, योगी आदित्यनाथांना वाटत असेल तर त्यांनी फिल्म इंडस्ट्री त्यांच्या राज्यात जरूर करावी. पण मुंबईत फिल्म इंडस्ट्रीचं असलेलं महत्व हे योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यामुळे कुठेही कमी होणार नाही असं म्हणत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची सत्ता जाते ती कधी परत येत नाही ही नारायण राणेंची ख्याती असल्याची टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर केली आहे. भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर प्रहार केला होता. ठाकरे सरकारच्या पायगुणामुळे कोरोना आल्याचं राणे यांनी म्हटलं होतं. या टिकेला खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याबाबत बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, नारायण राणेंनी फक्त मिटक्या मारत बसावं, त्यांना सत्ता काय किंवा सत्तेतील सहभाग काय, आता या आयुष्यात काय त्यांना मिळणं शक्य नाहीय. गद्दारीवर नारायण राणेंनी बोलावं यासारखा राजकारणातला दुसरा विनोद नसल्याची टीका राऊत यांनी यावेळी केली.