आठ दिवसानंतरही केवळ 50 टक्के शाळा सुरू

कोरोनाची दहशत; 13 हजार विद्यार्थ्यांची हजेरी

रत्नागिरी:- शाळा सुरु करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसात 9 वी ते 12 वी च्या पन्नास टक्केच शाळांमध्ये प्रत्यक्ष शिकवणीचे काम सुरु झाले आहे. कोरोनाची भिती अजूनही पालकांमध्ये असून जिल्ह्यात 83 हजारपैकी 12 हजार 876 विद्यार्थी प्रत्यक्ष शिकवणीसाठी वर्गात हजर राहत आहेत. कोरोनाची लस बाजारात आल्यानंतर हे प्रमाण वाढेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

शाळांचे प्रशासकीय कामकाज कोरोना काळातही सुरु होते; मात्र शिकवणीसाठी ऑनलाईनचा आधार घेतला जात होतो. राज्य शासनाने 9 वी ते 12 वीच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पालकांचे संमतीपत्र अत्यावश्यक करण्यात आले होते. शासनाच्या भुमिकेबाबत पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. माध्यमिक शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांची बैठक घेऊन शाळा सुरु करण्यासंदर्भात सुचना दिलेल्या होत्या. पहिल्या दिवशी अत्यल्प प्रतिसाद मिळाला. हळूहळू त्यामध्ये वाढ झाली असून आठवडाभरात 12 हजार 876 विद्यार्थी शाळेत हजर झाले आहेत. रत्नागिरी सारख्या शहरी भागात हे प्रमाण अत्यंत कमी आहे. ग्रामीण भागामध्ये शाळांमध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण चांगले आहे. रत्नागिरी तालुक्यात गेल्या आठ दिवसांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढलेले होते. ती भिती कायम असल्यामुळे अजुनही पालक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी संमती देत नाहीत. जिल्ह्यात 454 शाळा असून गेल्या आठवड्यात 247 शाळांचे शैक्षणिक कामकाज सुरु झाले आहे. कोरोना चाचणी झालेले 4, 266 शिक्षक आणि 1,371 शिक्षकेतर कर्मचारी शाळेत हजर आहेत. कोरेाना चाचणीत 9 शिक्षक आणि 3 शिक्षकेतर कर्मचारी बाधित आढळले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची स्थिती चांगली आहे. कोरोनावरील लस पुढील महिन्यात येईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतरच शाळांमध्ये विद्यार्थी येण्याचा वेग वाढेल अशी शक्यता आहे. ग्रामीण भागात मोबाईलला रेंज नसल्यामुळे शिक्षकांना ऑफलाईन शिकवणी घ्यावी लागत आहे. हे प्रमाण कमी असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.