रत्नागिरी:- जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पुढील पाच वर्षे सांभाळावा. त्यांच्या पाठीशी शिवसेना कायम उभी राहील. हे माझे वैयक्तिक मत नव्हे तर शिवसेनेचे आहे. जिल्हा सहकारी बँकेत राजकारण करुन त्या संस्थेची वाट लागण्यापेक्षा सकारात्मकतेने तीचे वलय चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करुया, असे सांगत राज्यात असलेली महाविकास आघाडी बँकेच्या निवडणुकीत कायम ठेवण्याचा सुतोवाच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केला.
आरडीसीसी बँकेने सुरु केलेल्या मोबाईल एटीएम व्हॅनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, कार्यकारी संचालक सुनिल गुरव यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. मंत्री सामंत म्हणाले की, देशाच्या राजकारणात वजन असलेले खासदार शरद पवार हे डॉ. चोरगे यांचे नाव काढतात यावरुन त्यांच्या कामाची ओळख लक्षात येते. चोरगे यांच्या प्रोत्साहनामुळे आम्ही राजकारणात इथपर्यंत पोचलो. बँकेचा पदभार घेतल्यानंतर चांगली कामगिरी केली आहे. बँकेची निवडणुक कधी आहे, हे मला माहिती नाही. शिवसेनेच्या लोकांना चांगले स्थान दिले तर बरं होईल. जे विरोधात उभे राहतील त्यांच्या जागा वाटून घेऊ. तसे स्पष्ट केले तर मुख्यमंत्र्यांना सांगायला बरे पडेल. निवडणुकीत समोरच्यांनी कितीही आक्रमक रुप घेतले तरीही ते परतवून लावण्यासाठी आम्ही चार पावले पुढे उभे राहू.
ते म्हणाले की उच्च व तंत्र शिक्षण खात्यामार्फत सहकार विषयावरील अभ्यासक्रम आणला जाणार आहे. त्यात सहकारातील शिक्षण संस्था कशा उभ्या राहतात याचा उहापोह केला जाईल. तसेच शासनाकडील निधी या बँक ठेवून ती अधिकाधिक सक्षम करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.
मोबाईल एटीएम व्हॅन हा आदर्शवत उपक्रम असून शेतकरी कुटूंबातील व्यक्तीला त्याचा फायदा मिळणार आहे. अशी व्हॅन बँकेने प्रत्येक तालुक्यात सुरु केली तर त्याचा फायदा शेतकर्यांना अधिकाधिक होणार आहे. या बँकेतील ठेवी वाढवण्यासाठी जिल्हाधिकार्यांशी मी चर्चा करणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 900 कोटीचे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालय हे बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्त्वावर उभारण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हे महाविद्यालय उभारण्यासाठी बँका, संस्था किंवा अन्य कोणी तयार असेल तर त्याचा विचार केला जाईल. यासाठी एक समिती स्थापन केली असून त्याचा अहवाल एक महिन्यात प्राप्त होईल असे मंत्री सामंत यांनी सांगितले.