खरेदीसाठी गर्दी; दोन दिवसात कोट्यवधीची उलाढाल
रत्नागिरी:- कोरोनाने कोलमडलेल्या बाजारपेठेला दिवाळी सणाने मोठी उभारी दिली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील सात महिन्यांपासून बाजारपेठेत पूर्ण मंदी होती मात्र शांत असलेल्या बाजारपेठेला दिवाळी सणाने नवी झळाळी मिळाली आहे. मागील दोन दिवसापासून बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली असून या कालावधीत कोट्यवधीची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.
दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा या उक्तीचा प्रत्ययच यावेळी येत आहे. कोरोना संकट विसरून प्रत्येकजण प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळीच्या तयारीत मग्न झाला आहे. हा सण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद घेऊन येतो. याचाच प्रत्यय बाजरपेठेतील व्यावसायिकांना आला आहे. कोरोनामुळे व्यावसायिकांचे पुरते कंबरडे मोडले. लॉकडाऊन झाल्याने व्यवसाय ठप्प राहिला. सात महिन्यात मोठे नुकसान झाले. मात्र दिवाळी सणाच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ग्राहकांनी व्यावसायिकांना दिलासा दिला आहे.
दिवाळीसाठी बाजारपेठ सजली आहे. पणत्या, कंदील, रांगोळी, फटाके, कपडे, भेटवस्तू, फराळ, किराणा अगदी छोट्या छोट्या दुकानांपासून मोठ्या मोठ्या दुकानात खरेदीसाठी गर्दी झाली आहे. शनिवारी दिवाळी आणि लक्ष्मी पूजन आणि सोमवारी पाडवा आणि भाऊबीज असल्याने पुढील तीन दिवस बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी राहणार असल्याची शक्यता आहे. मागील दोन दिवसांपासून झालेल्या खरेदीने कोट्यवधीची उलाढाल झाली असून आणखी तीन दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास व्यापाऱ्यांवर आलेले संकट काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.