रत्नागिरी:– तालुक्यातील मावळंगे-थूलवाडी येथील दोघांचा उलट्या-जुलाब होऊन मृत्यू झाला. साथीची भिती असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाले असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तातडीने वाडीतील 14 जणांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मावळंगे-थूलवाडी येथील अनेक लोक गावखडी येथील एकाच शेतकर्याकडे भात कापणीसाठी काही दिवसांपूर्वी गेले होते. तिथे भात कापणीसाठी गेलेले मावळंगे येथील राहुल मंगेश थूळ गेले अनेक दिवस आजारी होते. स्थानिक पातळीवर त्याच्यावर उपचार करण्यात आले. परंतु हातपाय दुखणे, रक्ताच्या उलट्या झाल्यामुळे 10 नोव्हेंबरला तो मृत झाला. त्यानंतर त्याच भागात भात कापणीसाठी गेलेली सौ. शालिनी थूळ काही दिवस आजारी होत्या. औषधोपचार सुरू असताना तिच्या नाकातोंडातून रक्त येऊन ती मृत झाली.
या प्रकारामुळे जिल्हा आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे. पुढील धोका टाळण्यासाठी व तिचे साथीत रूपांतर होऊ नये यासाठी 14 पुरुष व महिलांना वैद्यकीय तपासणीसाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
यासंदर्भात रत्नागिरी तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने मृत व्यक्तींच्या घरी जाऊन घटनेची माहिती घेतली आणि त्याचा अहवाल पुढे पाठविण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना या रोगामुळे मावळंगे गावामध्ये घबराट पसरली आहे.
मावळंगे येथे झालेल्या दोघांच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे त्याबाबत अद्याप काही निष्कर्ष काढता येत नाही. परंतु या 14 लोकांना कोणता संसर्ग झाला आहे, याच्या माहितीसाठी त्यांची संपूर्ण तपासणी शासकीय रुग्णालयात करण्यात येणार आहे. त्या अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल. मात्र त्यांच्याजवळ संपर्कात आलेल्या इतर लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरून संभाव्य धोका टाळता येईल असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ इंगळे यांनी सांगितले.