जिल्हा मंडप लाईट साऊंड इव्हेंट्स आणि केटरर्स असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

रत्नागिरी:-  कोरोनामुळे देशातील अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. सामाजिक, वैवाहिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमही होत नसल्याने टेन्ट, मंडप, कॅटरिंग, मंगल कार्यालय, बॅक्वेट हॉल, डि.जे. साऊंड, लाईट, डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापक आदी सेवा देणारे अडचणीत आले आहेत. याकडे शासनाचे लक्ष वेधावे म्हणून रत्नागिरी जिल्हा मंडप लाईट साऊंड इव्हेंटंस आणि केटरर्स असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले.

ऑल इंडिया टेन्ट डिलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशन नवी दिल्ली संलग्न ऑल महाराष्ट्र डिलर्स ऑर्गनायझेशन व संपूर्ण भारतातील शाखाची बैठक ऑगस्ट महिन्यात व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. यामध्ये केंद्र सरकारच्या राहत पॅकेज देण्याच्या संदर्भात विषयानुसार चर्चा होऊन या पॅकेजमध्ये हॉस्पिटॅलिटी आणि कोरोनाने प्रभावित व्यवसायांना सहाय्य करण्यासाठी केंद्रसरकार मदत करण्याच्या विचाराधीन आहे. या धर्तीवर महाराष्ट्रातील संबंधित व्यवसाय धारकांना मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमामध्ये मंडप, लॉन, मंगल कार्यालय, हॉलच्या क्षमतेपेक्षा अर्ध्या लोकांच्या आसन क्षमेतेची परवानगी देण्यात यावी किंवा पर्यायी 500 व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रमाची परवानगी देण्यात यावी, या व्यवसायाशी संबंधित जीएसटी 18 टक्के वरून 5 टक्के करावी, कर्जधारकाचे व्याज माफ करावे व प्रत्येक इएमआय स्थिती सामान्य होईपर्यंत चालू करू नये, या व्यवसायांना उद्योगाचा दर्जा द्यावा, आदी प्रमुख मागण्यांसह 12 मागण्या करण्यात आल्या आहेत.

या आंदोलनास रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर्सच्या वतीने गुरु चौगुले, कांचन मालगुंडकर यांनी उपस्थित राहून पाठींबा व्यक्त केला. दिवसभर चाललेल्या या आंदोलनात असोसिएशनचे अध्यक्ष अमरेश सावंत, उपाध्यक्ष राजन कोकाटे, सचिव सुहास ठाकूरदेसाई, खजिनदार मिलींद गुरव यांसह अन्य पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते.