शाळा दुरुस्ती निधीसह शिक्षक भरतीत स्थानिकांना न्याय देण्याची मागणी
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी धडाका लावला आहे. ग्रामविकासमंत्र्यांपाठोपाठ शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेत प्राथमिक शिक्षकांची भरती प्रक्रिया, निसर्ग वादळातील बाधित शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी यासह भरतीत स्थानिका न्याय देण्याचे प्रश्न मांडले. विविध समस्या सोडविण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आणि शिक्षण सभापती सुनिल मोरे यांनी शिक्षणमंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांची मंत्रालयात भेट घेतली. जिल्हयातील शैक्षणिक विकासाच्यादृष्टीने त्यांनी चर्चा केली. जिल्ह्यातील परिस्थितीचा व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या अनुषंगाने शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत त्यांच्याकडे विशेष मागणी केली. याला सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षक पदे लवकरात लवकर भरण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री यांनी दिले. शिक्षक भरतीत इतर जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश मोठयाप्रमाणात असतो. काही कालावधीनंतर ते शिक्षक मूळगावी बदलीने जातात. त्यामुळे रिक्त पदांमध्ये वारंवार वाढ होते. त्याचा मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होतो. याकरीता शिक्षक भरतीत स्थानिक शिक्षकांना प्राधान्य देण्याबाबत मागणी करण्यात आली. स्थानिक शिक्षकांची निवड झाल्यास स्थानिक उमेदवारांवरील अन्याय दुर होईल आणि कायमस्वरुपी शिक्षकही मिळतील. तसेच जिल्ह्याचे शैक्षणिक नुकसानही होणार नाही.
निसर्ग चक्रिवादळामुळे नुकसान झालेल्या शाळांना दुरुस्तीकरीता अनुदानाची गरज आहे. साडेआठ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून त्यापोटी सव्वा कोटी रुपयेच मिळाले आहे. शाळा सुरु झाल्या तर विद्यार्थ्यांना बसणे मुश्किल होईल. दुरुस्तीसाठी स्थानिक ग्रामपंचायतीही सक्षम नाहीत. त्यासाठी शासनाकडून अतिरिक्त निधी मिळाला तर भविष्यात निर्माण होणारी विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल. याबाबत अधिकचा निधी दिला जाईल असे त्यांनी सांगितले. या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद शिक्षणमंत्री श्रीमती गायकवाड यांनी दिला. त्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षण सभापती यांनी शिक्षणमंत्र्यांचे आभार व्यक्त केले. या चर्चेवेळी अध्यक्ष रोहन बने, सभापती श्री. मोरे, शिक्षक आमदार कपिल पाटील, विलास पोतनीस, शिवसेना विधान परिषद सदस्या डॉ. मनिषा कायंदे व शिक्षणाधिकारी श्रीमती निशादेवी बंडगर हजर होत्या.
शिक्षण विभागातील वर्ग 1, वर्ग 2 सह केद्रप्रमुखांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, 2020-21 ची संचमान्यता करुन मिळण्याबाबत, सहाय्यक शिक्षक (शिक्षण सेवक) यांच्या मानधनात वाढ होऊन 6 हजार रुपयावरुन 18 हजार रुपये प्रति महिना देण्यात यावे अशी मागणी शिक्षणमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.