रत्नागिरी:- कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले असून रत्नागिरीकर मोकळा श्वास घेण्यासाठी भाट्ये, मांडवी किनारा गाठू लागले आहेत. पुर्वीप्रमाणेच या ठिकाणी गर्दी दिसू लागली असून किनार्यावरील व्यावसायिकांना अच्छे दिन येत आहेत.
मार्च महिन्यात कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरवात केली आणि टाळेबंदी जाहीर झाली. कडक नियमांमुळे रस्त्यावर चिटपाखरुही दिसत नव्हते. रस्ते, किनारे, मंदिरे, बाजारपेठा सुनीसुनी झाली होती. कोरोनाच्या भितीमध्ये लोकांचा चांगलाच कोंडमारा झालेला होता. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तिन महिन्यात रुग्णांची संख्या वाढतच होती; मात्र ऑक्टोबर महिन्यात कोरोनावर मात करणार्यांचे प्रमाण वाढले. लोकांमधील भिती हळूहळू कमी होऊ लागली. नोकरी, व्यावसायीक वगळता अन्य लोकांचा घरातून बाहेर पडण्याचा टक्का कमी होता. व्यवहार सुरळीत होऊ लागले असून लोकांमधील भितीने आता सुरक्षिततेची जागा घेतली आहे. कोरोनातील परिस्थितीमुळे पर्यटक सोडाच स्थानिक लोकही फिरण्यासाठी बाहेर पडत नव्हते. त्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये, मांडवी हे नेहमी गजबजलेल्या किनार्यांवर शुकशुकाट होता. गेल्या पंधरा दिवसांमध्ये ही परिस्थिती बदलली असून कोरोनातील टाळेबंदीमुळे घुसमटलेले नागरिक फिरण्यासाठी किनार्यांकडे वळू लागलेले आहेत. कुटूंबिय लहान मुलांना घेऊन भाट्ये, मांडवी किनारी फिरण्यासाठी गर्दी करु लागले आहे. त्यामुळे किनार्यावर असलेल्या फेरीवाल्यांचे उत्पन्न सुरु झाले आहे. नारळपाणी, भेळ यासह विविध वस्तूंची विक्री करणार्यांची चलती आहे. गेले सहा महिने त्यांचे उत्पन्नच थांबलेले होते. झालेला खर्च भरुन काढण्यासाठी ही लोकं सरसावली असून दोन महिन्यात पुन्हा पुर्वीप्रमाणेच स्थिती पहायला मिळणार आहे.