रत्नागिरी:- मोटार वाहन कायद्यांतर्गत रस्त्यावरील वाहनांवर कारवाई करतांना आता, कागदपत्रांऐवजी ई-चलान मशिनचा वापर करता येणार आहे. वाहन चालकाने केलेल्या गुन्हाची नोंद आणि दंड देतांना, गाडी नंबर ई-चलान मशिनमध्ये टाकल्यास एका क्लिकवरच कारवाई करता येणार आहे. यामध्ये रोख पैसे स्विकारण्याचा पर्याय नसल्याने, कारवाईमध्ये पारदर्शकता येऊन परिवहन विभागाचा महसुल वाढविण्यात मदत होणार आहे.
राज्यातील प्रादेशिक परिवहन विभागाच्या भरारी पथकातील अधिकाऱ्यांना नुकतेच ई-चलान मशिन देण्यात आले आहे. त्यामूळे रस्त्यांवर कारवाईतील मानवी हस्तक्षेप टाळता येणार आहे. वाहन चालकाच्या परवान्याचा नंबर मशिनमध्ये टाकल्यास चालकाचा वाहन परवान्याची चालकाच्या फोटोसह संपुर्ण माहिती बघता येणार आहे. तर गाडीचा नंबर मशिनमध्ये टाकल्यास गाडीसंदर्भातील माहिती मशिन मध्ये दिसणार आहे. त्यामूळे चालकांवर आणि वाहनासंबंधीत कारवाई करणे सोपे होणार आहे.
मोटार वाहन कायद्यातील संपुर्ण गुन्ह्यांची नोंद या मशिनमध्ये करण्यात आल्याने, रस्त्यावरील वाहन चालकांकडून घडण्याऱ्या गुन्ह्यांचे नाव मशिन मध्ये लिहील्यास गुगल प्रमाणेच मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यांची संपुर्ण माहिती दिसते. त्यामूळे भरारी पथकातील अधिकाऱ्यांना कारवाई करतांना, वाहनाने मोडलेला नियम कोणत्या गुन्ह्यात मोडते याची माहिती शोधण्याची वेळ सुद्धा वाचवता येणार असल्याने, चालकांना चलन देणे सोपे झाले आहे.
यापुर्वी भरारी पथकाने कारवाई केल्यानंतर दंडाची रक्कम सांभाऴून ठेवत दुसऱ्या दिवशी बँकेत भरण्यात येत होती. मात्र आता, ई-चलान मशिनमूळे कॅशलेस कारवाई होणार असल्याने, पैसे बँकेत भरण्याचे काम कमी होणार आहे. त्याशिवाय, दंडाच्या रक्कमेतील अफरातफरीच्या घटना सुद्धा टाळता येणार असून, वेळेआधीच दंडाच्या स्वरूपात मिळणारा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा होणार आहे.
केंद्र सरकारच्या ई-चलान वेब साईटवर मशिन घेण्यापुर्वी लाॅगीन करावे लागणार आहे. त्यानंतरच संबंधीत मशिन त्या अधिकाऱ्यांच्या नावावर दिल्या जाणार आहे. त्यासोबतच किती चलान दिल्या, किती महसुल गोळा झाला, एकूण किती वेळ काम करण्यात आले अशी संपुर्ण माहिती याद्वारे कळणार आहे.