राजापूर गोवळमध्ये जमीन खरेदीत घोळ; सातबारा एकाच्या तर जमीन दुसऱ्यांच्या नावावर

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील गोवळ येथे एमआयडीसी करिता जमीन खरेदी करताना प्रचंड घोळ घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जमिनीच्या मालकीचे सातबारा एकाच्या नावावर तर त्याच जमिनींचे खरेदीखत दुसर्‍यांच्या नावाने केल्याचा प्रकार पुढे आला आहे. याला वरदहस्त कोणाचा असा सवाल इथल्या ग्रामस्थांनी केला असून याबाबत कायदेशीर लढा देण्याचा निर्धार गोवळमधील शेतकर्‍यांचे मुखत्यार गजाननप्रसाद विष्णू कोळवणकर यांनी पत्रकारांना दिली.

गोवळ एमआयडीसी ज्या ठिकाणी होणार आहे, तेथे जागेचे दर वाढतात. पाचपट अधिक दराने जमिनीचा मोबदला मिळतो. यामधून जमिनींच्या मालकीबाबत गुंतागुंत निर्माण करण्यात आली असावी. यासंदर्भात आवश्यक असणारी पुराव्याची सर्व कागदपत्रे मिळवण्यात आली असून संबंधीतांविरूद्ध लवकरच फौजदारी कारवाई करणार करु असे कोळवणकर यांनी सांगितले. जमिन मालकांना अंधारात ठेवून तसेच पक्षकार न करता, समजपत्र न देता अनेक शेतकर्‍यांचे हक्क डावलून मूळ जमिन मालकांतर्फे अवैध कागदपत्र बनवत बेकायदेशीर खरेदीखतेही केली गेली. अनेक वर्षांपूर्वी काही कुटुंब गोवळ गावत येवून स्थायिक झाली. त्यांनी येथील मिळकती संपादीत केल्या. कालांतराने मूळ मालकांनी आपल्या अतिरिक्त जमिनी विनामोबदला शासनाकडे जमा केल्या. त्याच जमिनी भूमीहिन आणि अल्प भूधारकांसाठी विहित क्षेत्रनिहाय वाटप केल्या. या जमिनीत लागवड करण्यासाठी शासकीय अर्थसहाय्यदेखील मिळाले; परंतु आता त्यातील अनेक जमिनींची परस्पर खरेदीखते झाली आहेत. जे अल्पभूधारक किंवा ज्या भूमिहिनांना जमिनी मिळाल्या त्यांना याची कल्पनाच नाही, असे श्री. कोळवणकर यांनी सांगितले.

गोवळची एमआयडीसी होणार असल्याची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर लगेचच, अशा जमिनींबाबत गैर कार्यपद्धती अवलंबून मालकी हक्क बदलण्यात आले आहेत. त्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रेही अवैध आहेत. त्याचे सर्व पुरावे आहेत असे मुखत्यार कोळवणकर यांनी सांगितले. याबाबत सोमवारी ते आपल्या सहकार्‍यांसोबत रत्नागिरीत आले होते. त्यांनी सर्व कागदपत्रे वकीलांना दाखवून कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर मुखत्यार कोळवणकर यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.