आयटीआय परिसरात अर्धवट मारलेले माकड आढळले झाडावर
रत्नागिरी:- ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात दहशत असलेल्या बिबट्याने आपला मोर्चा शहराकडे वळवला आहे. शहरातील आयटीआय आणि अभ्युदय नगरच्या मागील भागात असलेल्या बागांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. स्थानिकांना त्याचे दर्शन होत आहे. बिबट्याने कुत्रा आणि माकड फस्त केले आहे. अर्धवट फस्त केलेले माकड झाडावर मिळाले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये आता बिबट्याची भीती पसरू लागली आहे.
आयटीआय आणि अभ्युदयनगर परिसरात राहणारे कीर यांच्या पडवीतदेखील गणपती उत्सवाच्या काळात बिबट्या येऊन गेला. येथील रहिवासी नितीन कीर यांनी आयटीआयच्या मागील बांधावर बिबट्या पाहिला. शुक्रवारी (ता. 2) नितीन कीर याच परिसरात असणार्या आपल्या बागेत गेले असता त्यांना कुत्र्याचा आवाज व बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला. जवळच झाडावर बिबट्याने अर्धवट फस्त केलेले माकड अडकलेले त्यांनी पाहिले. नितीन कीर तेथून मागे फिरले आणि याची वनविभागाला खबर दिली. वनविभागाच्या अधिकार्यांनी या भागाची पाहणी केली व लवकरच येथे कॅमेरे लावणार असल्याचे आश्वासन दिले.
तालुक्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बिबट्या दिसत आहे. जंगलातील अधिवास कमी झाल्याने आणि बिबट्यांचे प्रमाण वाढल्याने काही बिबटे आपली हद्द करतात तर काही बिबटे विस्थापित होतात. विस्थापित झालेले आपल्या भक्ष्याच्या शोधात शहरी भागाकडे वळू लागले आहेत. पावस पंचक्रोशीसह काळबादेवी, मिरजोळे, शिरगाव, चरवेली, कोतवडे, जाकादेवी आदी भागात बिबट्याचे दर्शन होत आहे. बिबट्या शहरात दिसल्याचे उदाहरण नव्हते; मात्र आता तो शहरातही दिसू लागला आहे.
बिबट्याचा या भागात वावर आम्ही नाकारत नाही. नागरिकांनी खबरदारी घ्यावी. आम्ही उपाययोजना करीत आहोत; मात्र जे माकड सापडले आहे, ते बिबट्याने खाल्ले असे वाटत नाही. आमच्या टीमने त्याची पाहणी केली. त्या भागात खालच्या बाजूला मोठे जंगल आहे. त्यामुळे बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तेथे ट्रॅप कॅमेरे लावण्यात येतील. – प्रियांका लगड, रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी