आबीटगाव येथील प्रौढाची 1 लाख 33 हजारांची ऑनलाईन फसवणूक

चिपळूण:- तालुक्यातील आबीटगाव येथील प्रौढाचा फोन पे अ‍ॅपच्या कस्टमर केअरशी बोलत असल्याचा गैरसमज करुन देत त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन, त्या माहितीच्या आधारे प्रौढाची सुमारे 1 लाख 33 हजार 877 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ही घटना 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वा.सुमारास घडली.

याप्रकरणी लक्ष्मण बापूसो ढेंगे (55,रा.आबीटगाव, चिपळूण) यांनी सावर्डे पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानुसार, 23 सप्टेंबर रोजी त्यांनी आपल्या मुलाला फोन पे अ‍ॅपवरुन 1500 रुपये पाठवले होते. परंतू ते पैसे मुलाला मिळाले नव्हते. म्हणून ढेंगे यांनी गुगल सर्चच्या मदतीने फोन पे अ‍ॅपच्या कस्टमर केअरचे मोबाईल नंबर शोधून त्याव्दारे संपर्क साधला.तेव्हा बोलणार्‍याने मी फोन पे च्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगताच ढेंगे यांनी आपले 1500 रुपये परत मिळण्यासाठीच फोन केल्याचे सांगितले.तेव्हा त्या तोतयाने ढेंगे यांना पैसे परत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या बँक खात्याची सर्व माहिती व युपीआय पीन एकूण 11 वेळा घेउन त्यांच्या बँक खात्यातून 1 लाख 33 हजार 877 रुपये काढत ऑनलाईन फसवणूक केली.याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल गमरे करत आहेत.