सामान्यांची लुट करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई

ना. सामंत; औषधांचे दर निश्‍चित करुन जाहीर करणार

रत्नागिरी:- रुग्णवाहिकांसह कोविड, नॉनकोविडच्या औषधांचे दर निश्‍चित करुन ते जाहीर करण्यात येणार आहेत. तशा सुचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यापेक्षा अधिक दर आकारुन सामान्यांची लुट करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच मास्क न वापरणार्‍यांविरोधात कडक कारवाई केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात कोविडच्या स्थितीसंदर्भात अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतल्यानंतर ऑनलाईन पत्रकार परिषदेत श्री. सामंत बोलत होते. तत्पुर्वी जिल्हापरिषद सदस्य यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. श्री. सामंत म्हणाले, माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे चांगले काम करत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 42 हजार चाचण्या झाल्या असून 7,114 पॉझिटीव्ह रुग्ण मिळाले. आतापर्यंत 81 टक्के लोक बरी झाली आहेत. तसेच मृत्यूदरही साडेतीन टक्केच्या आत आहे. कोविड प्रतिबंध करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे अत्यावश्यक आहे. मास्क लावण्यावर बंधने आणण्याच्या सुचना जिल्हा पोलिस अधिक्षक यांना दिल्या आहेत. कोणी नागरिक सातत्याने करत असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. मास्कची सवय लावण्यासाठी जिल्ह्यातील 4 लाख 30 हजार घरांमधून 14 ते 15 लाख लोकांना प्रत्येकी दोन मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. मास्कबरोबरच प्रत्येक घरात सॅनिटायझरची बॉटलही दिली जाईल. रत्नागिरी मतदारसंघात आमदार निधीसह ग्रामपंचायत फंडातून मास्कचे वाटप केले होते. मास्क न घालणार्‍यांविरोधात पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे.
रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यासाठी रॅकेट चालवले जात असल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केल्यावर ते म्हणाले, नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. रुग्णांना परजिल्ह्यात नेण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जात असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. याबाबतचे दर लवकरच जाहीर करण्यात येतील. कोविडसह नॉनकोविडसाठी लागणार्‍या औषधांचे दर निश्‍चित करुन दिले जातील. त्यानंतरही अव्वाच्या सव्वा दर आकरले गेले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करु.

ऑक्सीसजन पुरवठ्याविषयी ते म्हणाले, कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सीजन, इंजेक्शनचा आवश्यक तेवढा पुरवठा जिल्ह्याला होत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले. जिल्ह्यात ऑक्सीजन रायगडवरून आणण्यासाठी संबंधित विभागचे अधिकारी राजेंद्र शिंगणे यांनी चांगले सहकार्य केले. रत्नागिरीमध्ये ऑक्सीजन निर्मितीचा प्लँट उभा रहावा यादृष्टीने विचार सुरु आहे.