रनपच्या 107 सफाई कर्मचार्‍यांची अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह

रत्नागिरी:- कोरोनाबाधित क्षेत्रात साफसफाईचे काम करणार्‍या रत्नागिरी नगर परिषदेतील १०७ आरोग्य कर्मचार्‍यांची अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आल्याने सार्‍यांनी सुटकेचा श्‍वास सोडला आहे. मंगळवारी नगर परिषदेत आरोग्य कर्मचार्‍यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती.

गेले सहा महिने रत्नागिरी शहरात कोविड योद्‌ध्यांप्रमाणेच नगर परिषदेचे आरोग्य कर्मचारी साफसफाईसह घंटागाडीद्वारे कचरा उचलण्याचे काम नियमित करीत आहेत. शहरात अनेक ठिकाणी कोरोनाबाधित क्षेत्रे जाहीर झाली. मात्र नगर परिषदेच्या आरोग्य कर्मचार्‍यांचे काम मात्र कधीच थांबले नाही. गेले सहा महिने हे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून शहरात विविध भागात स्वच्छतेचे काम करीत आहेत.

रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी महत्वपूर्ण निर्णय घेत शहराची स्वच्छता करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंगळवारी दुपारी नगर परिषदेच्या आवारात १०७ आरोग्य कर्मचार्‍यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली.हे सर्व कर्मचारी कोरोनाबाधित क्षेत्रात स्वच्छतेचे काम करीत होते. त्यामुळे अनेकांच्या मनात भीती होती. मात्र या सर्वांचे अँटीजेनचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सार्‍यांनी सुटकेचा श्‍वास सोडला आहे.