ब्रेक द चेनसाठी पाचल बाजारपेठ आजपासून पाच दिवस बंद

राजापूर:- राजापूर तालुक्यातील पूर्व विभागातील पाचल बाजारपेठ 15 सप्टेंबर 2020 ते 19 सप्टेंबर 2020 पर्यंत स्वयंस्फुर्तीने बंद करण्याचा निर्णय पाचल येथील पेठवाडीतील व्यापार्‍यानी घेतला आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी व्यापार्‍यानी हा निर्णय घेतला आहे.

राजापूर तालुक्यातील पाचल ही बाजारपेठ जवळजवळ 40 ते 45 गावांना जोडणारी मोठी बाजारपेठ आहे. संपूर्ण जगामध्ये कोरोनाने थैमान घातले असताना भारतामध्ये सुद्धा धोरणाने शिरकाव केला. त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली त्याच वेळी पाचल गावाने सुद्धा कडक लॉकडाऊन केला होता. त्यामुळे पाचलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता परंतु ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात पाचलमधील एकाच कुटुंबातील सात जणांना कोरोनाची बाधा झाली व त्यातील 60 वर्षीय महिलेचे निधन झाले त्यावेळी सुद्धा सात दिवस संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर गणपती उत्सवाच्या कालावधीमध्ये बाजारपेठ पुन्हा सुरू करण्यात आली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनलॉक ची प्रक्रिया सुरू असल्यामुळे नियमितपणे बाजारपेठ व इतर सर्व व्यवहार सुरू होते आणि अचानक पाचल आणि रायपाटण या गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आणि ही साखळी कुठेतरी तोडली पाहिजे याच विचाराने पाचल बाजारपेठ स्वयंस्फुर्तीने पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय व्यापार्‍यानी घेतला आहे.