बसरा जहाजासंदर्भात पुढील निर्णय सर्व्हेनंतर

भंगारात काढायचे की दुरुस्त करायचे? यासाठी मेरीटाइम आर्गनायझेशनकडून सर्व्हे

रत्नागिरी:-निसर्ग चक्रीवादळात  भरकटून मिर्‍या किनार्‍यावर अडकलेल्या बसरा स्टार जहाजाचे किनार्‍यावर आदळून मोठे नुकसान झाले आहे. तळ सुमारे 60 टक्के फुटला आहे. जहाज दुरुस्तीला मोठा खर्च आहे. त्यामुळे जहाज भंगारात काढायचे का? की, दुरुस्त करायचे, हे मेरीटाइम आर्गनायझेशनच्या सर्व्हेअरकडून सर्व्हे केल्यानंतर ठरणार आहे. पुढच्या आठवड्यात हा सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगल यांनी दिली.
 

चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेले बसरा स्टार हे इंधनवाहू जहाज चार महिने व्हायला आले तरी मिर्‍याकिनारी अडकून पडले आहे. पावसाळ्यातील अनेक हायटाईड भरतीच्या उंच लाटांचा तडाखा जहाजाने सोसलाय मात्र आता जहाजाची परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे. किनार्‍याची धूप थोपविण्यासाठी दगडांचा बंधारा घातला आहे. या दगडांच्या बंधार्‍यावर आदळून जहाजाची पुरती वाताहात झाली.

60 टक्के फाटल्याचा अंदाज बंदर विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुणे जहाज भंगारात काढले जाणार की दुरुस्त केले जाणार, याकडे लक्ष आहे. दुरुस्तीला येणारा खर्च जास्त असला तर ते भंगारात काढण्याचा एजन्सीचा विचार आहे. त्यासाठी इंटरनशनल मेरीटाईम आर्गनायझेशनच्या मुंबईतील सर्व्हेेअरकडून या जहाजाचा आढावा घेतला जाईल.

त्यासाठी सर्वेअर पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. जहाजामधील ऑइल व डिझेल काढल्याने ते आता सुरक्षित आहेय मात्र समुद्रकिनारा जहाजामुळे असुरक्षित झाला आहे. तो सुरक्षित ठेवण्यासाठी बंदर विभाग पाठपुरावा करीत आहे. इंटरनशनल मेरीटाईम आर्गनायझेशनच्या माध्यमातून होणार्‍या सर्व्हेेनंतर ते भंगारात काढायचे की दुरुस्त करायचे याचा निर्णय घेण्यात येणार आहे.