रत्नागिरी:- या वर्षी निर्णयसागरचा अश्विन महिना अधिक व टिळक पंचागाचा पुढील वर्षी ज्येष्ठ महिना अधिक असल्यामुळे पुढच्या महिन्यापासून सर्व सणांमध्ये एक महिन्याचा फरक पडणार आहे. म्हणजे टिळक पंचागाचे नवरात्र 18 सप्टेंबरपासून सुरू होईल व निर्णयसागरचे नवरात्र पुढील महिन्यात चालू होईल. त्या वेळी टिळक पंचांगाची दिवाळी सुरू असेल. दिवाळी व देवदिवाळी हे सण एकत्र होतील.
टिळक पंचाग वापरणार्यांची संख्या कमी असली तरीही अनेक गावांमध्ये टिळक पंचांगाचे अनुसरण केले जाते. शाळा, महाविद्यालयांना यानुसार सुटी मिळत नसल्याने अनेकांनी हे पंचांग बदलले. 2015 मध्ये दोन्ही पंचागांनुसार फक्त गणेशोत्सव वेगवेगळा साजरा झाला व लगेचच अश्विन महिन्यात दोन्ही पंचागे एक झाली. त्यामुळे पुढील सणांमध्ये फरक पडला नाही. यंदा सुमारे सहा महिन्यांचा फरक पडणार आहे.
पंचागकर्त्यांनी चांद्रमास व ऋतूंची सांगड कायम राहण्यासाठी अधिक मास दिला आहे. ज्या चांद्रमासात सूर्याचे राशिसंक्रमण होत नाही तो अधिकमास असतो. सूर्यसंक्रांतीच्या वेळेत सुमारे चार दिवसांचे अंतर आणि दोघांच्या राशिचक्रारंभ स्थानामध्ये चार अंशाचा फरक आहे. जुन्या पंचांगानी पूर्वीच्या गणिताच्या स्थूलतेमुळे झालेली चूक तशीच ठेवली आहे व टिळक पंचांगाने ही चूक दुरुस्त केली आहे.
टिळक पंचांगाविषयी..
प्रो. छत्रे यांनी 1865 पासून हे भारतातील पहिले दृकप्रत्ययी शुद्ध निरयन पंचाग उदयास आणले. रत्नागिरीतील जगन्मित्र छापखान्याचे मालक जनार्दन आठल्ये हे 1869 ते 89 या काळात पंचांग छापत. लोकमान्य टिळकांनी या पंचागाचा पुरस्कार केल्यावर 1926 पासून हे पंचाग केसरी मराठा संस्थेतर्फे छापले जाते.