‘काळ्या जादू’साठीच मांडूळ सापांची तस्करी

अंधश्रद्धेतून होतात प्रकार; डबल इंजिन असेही नाव

रत्नागिरी:- समज-गैरसमाजामधून विविध प्रकारच्या प्राण्यांची तस्करी केली जाते. त्याप्रमाणेच विशिष्ठ वजनाचे आणि लांबीच्या मांडूळांचा उपयोग काळ्या जादुसाठी केला जात असल्याचे पुढे येत आहे. त्यातूनच संपूर्ण महाराष्ट्रात तस्करीचे प्रकार घडतात. काळ्या जादूचे हे प्रकार पश्‍चिम बंगालमध्ये सर्वाधिक होत असल्याचा अंदाज आहे.

अंधश्रद्धा आणि गैरसमजामधून अनेकजण वन्यप्राण्यांच्या तस्करीकडे वळतात. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल केली जाते. त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेसह काही प्राणीमित्रही कार्यरत आहेत. रत्नागिरीत मांडूळ आणि खवले मांजराची तस्करी करणार्‍या आठ जणांची टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मांडूळाची तस्करी ही काळ्या जादुटोण्यासाठी केली जात असून त्याच्यामुळे भरपूर पैसे मिळतात असा समज आहे. पैशाच्या हव्यासापोटी त्याचा बळी घेतला जातो. त्याला डबल इंजिन असेही म्हणतात. चार किलो वजनाचा मांडूळ पाहिजे अशी मागणी केली जाते; परंतु हा साडेतीन फुटापर्यंत वाढतो, त्याचे वजन जास्तीत जास्त पाऊण ते एक किलोपर्यंतच राहते. त्यापेक्षा अधिक वजनाचे मांडूळ कुठेच सापडत नाही. वर्तमान पत्रावर हा साप ठेवला की अक्षरे गायब झाली पाहिजेत, पाण्यात ठेवल्यानंतर त्याची दोन्ही तोंडे ही यु आकारात पाण्यावर आली तरच तो फायदेशीर असा समज आहे. प्रत्यक्षात या दोन्ही गोष्टीही होऊ शकत नाहीत. तसेच आरशासमोर मांडूळ ठेवला तर त्याचे प्रतिबिंब दिसता कामा नये, त्यांच्या संपर्कात टेस्टर नेल्यास तो पेटला तर त्याची उपयुक्तता अधिक असाही गैरसमज आहे. लक्षण असतील तर त्याला लाखो रुपयांना विकले जात असल्याचे पुढे येत आहे. याचा जमिनीतील गुप्तधन शोधण्यासाठीही याचा वापर होतो.