कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा कडक निर्बंध

रत्नागिरी:- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याने तो रोखण्यासाठी निर्बंध पुन्हा कडक केले आहेत. तसा नवा आदेश काल जिल्हा प्रशासनाने लागू केला. मात्र शासनाच्या आदेशास अनुसरून जिल्ह्यात काही बाबींना मुभा देण्यात आल्या आहेत. विवाहासाठी जास्तीत जास्त 50 आणि अंत्यसंस्कारासाठी जास्तीत जास्त 20 जणाना परवानगी आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना अनिवार्य केलेल्या बाबी अशा, सर्व नागरिकांना सार्वजनिक तसेच कामाच्या ठिकाणी मास्क, चेहरा झाकणे बंधनकारक केले आहे. सार्वजनिक व वाहतुकीदरम्यान सामाजिक अंतर बंधनकारक, दुकानामध्ये किंवा परिसरामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्ती, ग्राहक यांना प्रतिबंध करण्यात आला आहे. उपस्थित व्यक्तींमध्ये 6 फूटापेक्षा जास्त अंतर बंधनकारक आहे.सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी थुंकणे दंडनीय आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखूजन्य पदार्थाना प्रतिबंध आहे. शक्यतो काम घरातून करण्यात यावे. कार्यालये, आस्थापनामधील सर्व प्रवेश व बाहेर पडण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हँडवॉश, सॅनिटायझर आवश्यक आहे.

शाळा, कॉलेज, शैक्षणिक, प्रशिक्षण  शिकवणी देणार्‍या संस्था इत्यादी हे 30 सप्टेंबर 2020 पर्यंत बंद राहतील. ऑनलाइन, दूरस्थ शिक्षणास परवानगी राहील. चित्रपटगृहे, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, नाट्यगृहे (मॉल व मार्केट कॉम्प्लेक्ससह), बार, ऑडिटोरियम, असेंब्ली हॉल यासारखी तत्सम सर्व ठिकाणे बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम तसेच इतर मेळाव्यांना प्रतिबंध आहे. जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणारी दुकाने, आस्थापना यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार सुरू राहतील. 2 सप्टेंबर 2020 पासून सर्व प्रकारची अत्यावश्यक नसलेल्या सोई सुविधा पुरविणारी दुकाने, आस्थापना सवलती आणि मार्गदर्शक तत्वाप्रमाणे तसेच लिकर शॉप सुरू राहतील.