मास्क सरळ करत असताना दुचाकी घसरली; एकाचा मृत्यू

रत्नागिरी:- तोंडावरील मास्क सरळ करीत असताना दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात दुचाकीवरील सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना उंडी ते खंडाळा मार्गावर घडली. याप्रकरणी दुचाकी स्वाराविरोधात जयगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात २ सप्टेंबर रोजी झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भालचंद्र लक्ष्मण घवाळी हे २ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या दुचाकीवरून उंडी ते खंडाळा असे निघाले होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीवर बळीराम रामचंद्र घवाळी (वय ६२) हे मागे बसले होते. घवाळी हे दुचाकी भरधाव वेगाने चालवत असतानाच तोंडाला लावलेला मास्क सरळ करण्याच्या नादात दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी स्लीप होऊन अपघात झाला. या अपघातात बळीराम घवाळी हे जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी भालचंद्र घवाळी यांच्याविरोधात जयगड पोलीस स्थानकात भादंविक ३०४ अ, २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील करीत आहेत.