रत्नागिरी:- रिव्हॉल्वरच्या धाक प्रकरणात आता चौकशीचा ससेमिरा सुरु झाला असून पीडितेचा तक्रार अर्ज चौकशीसाठी डीवायएसपी गणेश इंगळे यांच्याकडे आल्यानंतर सोमवारी पीडित महिला आणि तिच्या आजोबांची तब्बल ३ तास चौकशी डीवायएसपी कार्यालयात झाली. याप्रकरणी दोघांचेही जाबजबाब नोंदवण्यात आले असून डीवायएसपींकडे सुरु झाल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
आपल्या पतीसोबत प्रेमसंबंध आहेत, या संशयावरून तालुक्यातील नाखरे नरवणेवाडी येथे एक वेगळाच प्रकार घडला होता. राजकारणात नेतृत्त्व करणारी एक महिला रणरागिणीचा अवतार घेऊन नाखरेमध्ये दाखल झाली होती. त्या महिलेने नाखरेतील पीडितेला चांगलेच धमकावल्याची चर्चा आहे. तसेच पीडितेवर दबाव आणून तिच्याकडून चुकीच्या पद्धतीने जबाब नोंदवण्यात आला होता. घाबरलेल्या त्या महिलेेने सुरुवातीला दबावाला बळी पडून त्या पद्धतीने जबाब दिला. मात्र तेथून बाहेर पडल्यानंतर पीडितेने थेट पोलीस अधिक्षकांकडे दाद मागितली.
या पीडितेने पोलीस अधिक्षकांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर हा तक्रार अर्ज चौकशीसाठी डीवायएसपी कार्यालयात आला होता. स्वत: डीवायएसपी गणेश इंगळे यांनी पीडितेला चौकशीसाठी बोलावून घेतले होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता पीडिता व तिचे आजोबा हे चौकशीसाठी डीवायएसपी कार्यालयात आले होते. तब्बल ३ तास चौकशी सुरु होती. या प्रकरणात डीवायएसपींनी सखोल तपास करण्याचा निर्णय घेतला असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. लवकरच यातील सारे तथ्य बाहेर येण्याची शक्यता आहे.