पुर्वा किनरेसह आकांक्षा कदमला शिवछत्रपती पुरस्काराचे शुक्रवारी होणार वितरण

रत्नागिरी:- शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2022-23 योगासन खेळामध्ये पुर्वा शिवराम किनरे तसेच सन 2023-24 साठी कॅरम खेळासाठी आकांक्षा कदम या दोघींना जाहीर झालेला आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे शुक्रवार 18 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे.

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ट क्रीडा महर्षि यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शकांकरिता) व ‍शिवछत्रपती राज्य पुरस्कार-खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी पुरस्कार असे पुरस्कार प्रदान करण्यात येऊन त्यांचा गौरव केला जातो. जिल्ह्यातील श्रीमती किनरे आणि श्रीमती कदम या दोघींना शिवछत्रपती राज्य पुरस्कार शुक्रवारी वितरीत करुन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी दिली.