15 ऑगस्टपर्यंत उपक्रम; स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन
रत्नागिरी:- गावेच्या गावे स्वच्छ रहावीत यासाठी केंद्र शासनाने ‘गंदगी मुक्त भारत’ अभियान राबविण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार 15 ऑगस्टपर्यंत जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वच्छता मोहिम आयोजित करावयाची आहे.
पंतप्रधान यांच्या सुचनेनुसार 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळयानिमित्त सर्व देशात ‘गंदगी मुक्त भारत’ अभियान राबवायचे आहे. प्रत्येक दिवसाला गावात स्वच्छतेविषयी उपक्रम हाती घ्यावयाचा आहे. यामध्ये सर्व ग्रामपंचायतींचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. विविध उपक्रमाद्वारे स्वच्छतेत सकारात्मक बदल ग्रामस्थात निर्माण होण्यासाठी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी नियोजनबध्द करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर दिली गेली आहे. यामध्ये हागणदारीमुक्ती शाश्वतता व संपूर्ण स्वच्छतेबाबत लोकशिक्षण देणे, जनजागृतीपर स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) मोबाईल अकादमी सुरु करणे, स्वच्छाग्रहींना 18001800404 या टोल फ्री क्रमांकावर माहिती घेण्यासाठी प्रोत्साहीत करावयाचे आहे. सरपंच यांच्याबरोबर व्हीडिओ कॉन्फरन्स घेऊन हागणदारीमुक्त ग्रामपंचायत, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, हागणदारीमुक्त ग्रामपंचायत प्लसमधील उपक्रम, सार्वजनिक शौचालय, शाळा-अंगणवाडी स्वच्छतागृह इत्यादी बाबत माहिती दयावयाची आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवायचे आहेत.
ग्रामपंचायतीमधील सार्वजनिक ठिकाणी, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय-निमशासकीय कार्यालये, संस्था इत्यादी ठिकाणी श्रमदानाद्वारे वृक्षारोपण उपक्रम आयोजित करावयाचा आहे. प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील आठवीतील विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन पेंटिंग स्पर्धा, 9 वी ते 12 वी मधील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घ्यावयाच्या आहेत. या स्पर्धाचा विषय हा ‘गंदगी मुक्त माझं गांव’ असा आहे. ग्रामपंचायतीमधील सार्वजनिक इमारतीची श्रमदानाद्वारे संपर्ण स्वच्छता करणे. या मोहिमेंतर्गत उपक्रमांचे आयोजन करताना कोविड 19 च्या प्रादुर्भावाचा विचार करता, यासंबंधीच्या आदर्श मार्गदर्शक सूचनांचे पालन करुनच उपक्रमाचे नियोजन करावे. उपक्रमांचे नियोजन करताना व्हर्चुअल व्यासपीठे आणि दूरस्थ संवादाची साधनांचा वापर होईल याबाबत दक्षता घेऊनच कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात यावी असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी केले आहे.