थ्रीडी मॅपिंग मल्टीमीडिया शोमुळे रत्नागिरी आंतरराष्ट्रीय स्तरावर

कोकणच्या पर्यटनाला मोठी चालना, निधीची कमतरता पडू देणार नाही: अजित पवार

रत्नागिरी:- थिबा पॅलेस परिसरातील थ्रीडी मॅपिंग मल्टीमीडिया शो या सुंदर प्रकाश योजनेमुळे रत्नागिरीचे नाव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू दे आणि कोकणच्या पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळू दे, अशा प्रकारच्या शुभेच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देतानाच, काम कसं असावं हे रत्नागिरीमध्ये जाऊन पहावे. अशा उत्तम प्रकारच्या कामांकरिता अर्थमंत्री म्हणून निधीची कमतरता पडू देणार नाही, असा शब्द त्यांनी दिला.

थिबा पॅलेस परिसरातील थ्रीडी मॅपिंग मल्टीमीडिया शो चे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते काल रात्री झाले. यावेळी पालकमंत्री डॉ. उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, ज्या राजाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन, रयतेचं राज्य कसं असायला पाहिजे, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन कसं जायचं, याचा आदर्श जगापुढे निर्माण केला. त्या युगपुरुष शिवाजी महाराजांची आज तिथीप्रमाणे जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा देतो. शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो व त्यांना मानाचा मुजरा करातो. आजचा दिवस हा रत्नागिरी जिल्ह्याकरिता, शहराकरिता अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक अशाप्रकारचा आहे. कारण महाराष्ट्राच्या पर्यटनाला, समृध्दीला पुढे नेणाऱ्या आणखी एका पर्वाची सुरुवात आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही कोकण भूमी, देवभूमी खऱ्या अर्थाने स्वराज्याचा विस्तार खऱ्याअर्थानं या देवभूमीवर झाला आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही.आज मला थिबा पॅलेस हा रत्नागिरीच्या समृध्द वारस्याचा एक अनमोल ठेवा हा आपण समजतो. थ्रिडी प्रकाश योजनेच्या माध्यमातून या ऐतिहासिक वास्तूला नवी झळाली देण्याचा प्रयत्न उदय सामंत यांच्या दूरदृष्टीतून झालेला आहे. या अत्याधुनिक प्रकाश योजनेमुळे केवळ स्थानिकच नाही, फक्त रत्नागिरीकरच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातील पर्यटक येथे आकर्षित होतील. प्रकाश आणि छायाचित्रणाच्या माध्यमातून इतिहास जिवंत करण्याचा हा एक सुंदर आणि अनोखा असा प्रसंग आहे.

समाज कंटकांच्या कोणत्याही अफवेला बळी पडू नका. कोकणाच्या या भूमीची बदनामी होऊ नये , त्याचा परिणाम येथील पर्यटनावर होऊ शकतो. कोकणाच्या या भूमीमध्ये सामाजिक ऐक्य राखण्याचं आवाहन आपल्या सर्वांना मी करीन. कारण, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या आपण सर्व जातीधर्माची लोक अतिशय गुण्यागोविंदाने येथे राहतो. त्याला कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, देशातला हा पहिला थ्रीडी मल्टीमॅपिंग शो आहे. याची खाशीयत अशी आहे की या शो मध्ये आपल सर्व कोकण भरलेलं आहे. कोकणामध्ये ज्या ज्या कोणी विभुती होऊन गेल्या त्यांचा आदर्श आमच्या पुढच्या पिढीसमोर टिकावा आणि त्यांनी तो आदर्श घेऊन आपल्या आयुष्यामध्ये वागावे, हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून हा शो सगळ्या पर्यटकांसाठी आम्ही खुला करत आहोत. शालेय विद्यार्थ्यांसाठी तिकीट कमी असेल. हा देशाच्या, महाराष्ट्राच्या पर्यटनाच्यादृष्टीने अतिशय महत्वाचा असा शो आहे. मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी आभार प्रदर्शन केले.