जिल्ह्यात २ हजार ९३८ बंधाऱ्यात ७३२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा

रत्नागिरी:- जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत दरवर्षी गावपातळीवर पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून बंधारे उभारले जातात. यंदा लोकसहभागातून वनराई, विजय, कच्चे या प्रकारचे जिल्ह्यात २ हजार ९३८ बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामध्ये सुमारे ७३२ द. ल. घ. मी. इतका पाणीसाठा झाला असून, सुमारे श्रमदानामुळे सुमारे २ कोटी रुपयांची बचत झाली आहे. बंधाऱ्यांमुळे किनारी भागातील विहिरींची पाणीपातळी वाढल्याने टंचाईची तीव्रता कमी झाली आहे.

जिल्ह्यात एप्रिल व मे या दोन महिन्यात दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गतवर्षी दीडशेपेक्षा जास्त गावांना टँकरने पाणी पुरवावे लागले होते. पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून दरवर्षी कच्चे, वनराई व विजयी बंधारे बांधण्याचे नियोजन केले जाते. त्यानुसार यंदा ८ हजार ६८५ बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित केलेले होते. गतवर्षी ६ हजार बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे थोड्या फार प्रमाणात पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली होती.

गावातून वाहणारे नाले, वहाळ, उपनद्या यावर तात्पुरते बंधारे बांधून त्या पाण्याचा उपयोगही करण्यात आला. लोकसहभाग व श्रमदानातून हे बंधारे उभारले जात आहेत. कोकण कृषी विद्यापिठाने तयार केलेल्या विजयी बंधाऱ्याचे मॉडेल पाणी साठवून ठेवण्यासाठी अधिक उपयुक्त ठरत आहे. सिमेंटच्या पोत्यांचा उपयोग करून हे बंधारे उभारले जात आहेत. यंदा अगदी ऑक्टोबरपर्यंत मोसमी पाऊस सुरू होता. त्यामुळे गावागावातून वाहणाऱ्या नदीनाल्यांचे प्रवाह वेगवान होते. परिणामी, प्रत्यक्ष बंधारे बांधण्यासाठी यावर्षी थोडा उशीर झाला.

सध्या ठिकठिकाणी हे बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक गावाला दहा बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट ठेवलेले होते. आतापर्यंत ९९४ कच्चे बंधारे, ४६५ वनराई बंधारे, १०३२ विजयी बंधारे बांधण्यात आले आहेत. ही मोहीम मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असणार आहे. त्यामध्ये दापोलीत सर्वाधिक बंधारे बांधले गेले आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या बंधारे मोहिमेची डॉ. सुमंत पांडे यांनीही माहिती घेतली. एका बंधाऱ्याची त्यांनी पाहणीही केली. सरासरी एक बंधाऱ्यात सुमारे दोन ते तीन लाख लिटर पाणीसाठा झाला असावा. जिल्ह्यात उभारलेल्या सर्व बंधाऱ्यांमध्ये सुमारे ७३२ टीसीएम पाणी साठले असावे, असा अंदाज आहे.