रत्नागिरी:- गेल्या चार ते पाच दिवसांपासून अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्याची स्थिती अजूनही कायम आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी शनिवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कोकण व घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मध्य प्रदेशाच्या नैऋत्य भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच कोकणच्या उत्तर भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. बंगालचा उपसागर ते मध्य प्रदेशाचा परिसर, जबलपूर, कोर्बा या भागात मॉन्सूनचा आस असलेला पट्टा कार्यरत आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. कोकणच्या उत्तर भागात असलेल्या चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे कोकण किनारपट्टीवर ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे.
येत्या चार ते पाच दिवस कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच घाटमाथ्यावरही अतिवृष्टी होणार असून मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यात बहुतांशी भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. पूर्व भागात पावसाचा जोर कमी राहणार आहे. मराठवाड्याच्या बहुतांशी भागात व विदर्भातील पश्चिम भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. सोमवारी (ता.१०) कोकण, विदर्भात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.